बारामती (पुणे) : बारामतीत एक अनोखी घटना समोर आली आहे. या घटनेत पुणे सायबर पोलिसांची आयडिया यशस्वी ठरली असून चक्क चोरी गेलेला मोबाईल चक्क कुरिअरने तामिळनाडूतून थेट बारामतीत आला आहे. आणि बारामती पोलिसांनी नागरिकाला तो मोबाईल बुधवारी (ता.२५) सुपूर्त केला आहे.
बारामती येथील न्यायालयात काम करणारे आकाश संजय खंदारे यांचा ४५ हजार रुपयांचा मोबाईल १४ नोव्हेंबर २०२२ रोजी चोरी झाला होता. याप्रकरणी त्यांनी मोबाईल चोरी झाल्याची तक्रार बारामती शहर पोलिस ठाण्यात दिली होती. हा मोबाईल तामिळनाडूमध्ये ‘अॅक्टिव्हेट’ झाल्याचे पोलिसांना समजले.
पोलिसांनी तामिळनाडूच्या त्या मोबाइलधारकाला फोन केला. त्याला या मोबाइलबाबत तक्रार बारामती शहर पोलिस स्टेशनला असल्याचे सांगितले. तसेच तो मोबाइल तत्काळ पाठवून द्यावा, अन्यथा आपल्यावर कारवाई करण्याचा पोलिसांनी इशारा दिला.
त्यानंतर पोलिस कारवाईच्या भीतीने तामिळनाडूच्या इसमाने तो फोन दुसरा कोणाकडून तरी विकत आहे असे सांगितले. आणि त्याने थेट कुरिअरमध्ये जाऊन तो मोबाइल बारामती शहर पोलिस ठाण्याच्या पत्त्यावर पाठवून दिला. ही कामगिरी सायबर पोलिस ठाणे, बारामती शहर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक कुलदीप संकपाळ, दशरथ इंगवले यांनी केली आहे.
दरम्यान, बारामती शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांनी हा मोबाइल तक्रारदाराला परत दिला. आपला मोबाइल पाहून तक्रारदाराला अतिशय आनंद झाला कारण त्याचा मोबाइल ४५ हजार रुपये किमतीचा होता. त्याने संपूर्ण पोलीस दलाचे आभार मानले.