पुणे : पुणे शहरातील डेक्कन येथील वैकुंठ स्मशानभूमीत शुक्रवारी (ता. २३) मध्यरात्री अडीचच्या सुमारास दोन तृतीयपंथी चितेजवळ जादूटोणा सारखे अघोरी कृत्य करतानाची घटना समोर आली होती. आईला असणारा कॅन्सरचा आजार बरा होण्यासाठी त्यांच्याकडून हा अघोरी प्रकार करण्यात आल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे.
स्मशानभूमी मधील सुरक्षा रक्षकाने हा प्रकार उघडकीस आणला होता. याप्रकणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानुसार पोलिसांनी लक्ष्मी निबाजी शिंदे (वय 31, मुंबई) आणि मनोज अशोक धुमाळ (22, रा. पुणे) या दोन तृतीयपंथीयांना अटक केली होती. वरिष्ठ निरीक्षक सुनिल माने व त्यांच्या पथकाने या दोघांकडे सखोल तपास केला असता त्यांच्याकडून धक्कादायक माहिती समोर आली.
मनोज धुमाळ आणि लक्ष्मी शिंदे हे दोघेही गुरू शिष्य आहेत. अशोक धुमाळ याच्या आईला कॅन्सरचा आजार आहे. त्यांच्या आईला कॅन्सरचा आजार लक्ष्मी बरा करणार होता.
त्यानंतर लक्ष्मीने तो आजार दुसऱ्या व्यक्तीच्या अंगात घालवून देतो, असे अशोकला सांगितले. त्यामुळे ते पूजेसाठी वैकुंठ स्मशानभूमीत गेले. त्यासाठी त्यांनी एक कोंबडी, दहा ते बारा व्यक्तींचे फोटो, काळ्या भाऊल्या, लिंबू, हळद-कुंकू व इतर वस्तू त्याठिकाणी ठेवून त्याची पुजा सुरू केली होती. मात्र त्याच दरम्यान त त्यांना पकडण्यात आले.