पुणे : एका दिव्यांग मुलाला शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्याने जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना धामनखेल (ता.जुन्नर) येथील विशेष मुलांच्या शाळेत घडली आहे. याप्रकरणी शिक्षक व कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे.
शाळेचे शिक्षक विकास बाजीराव घोगरे व कर्मचारी सुभाष दिलीप ठोकळ असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. न्यायालयाकडून आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगा गतिमंद आणि अपंग असून, त्याने नुकताच धामनखेल (ता.जुन्नर) येथील विशेष मुलांच्या शाळेत प्रवेश घेतला होता. शाळेचे शिक्षक विकास बाजीराव घोगरे व कर्मचारी सुभाष दिलीप ठोकळ यांनी या मुलाला जबर मारहाण केली आहे.
दरम्यान, या मारहाणीत मुलाच्या डाव्या हातावर जखमांचे व्रण आहेत, शाळेतील लोखंडी पाईपने डाव्या हाताच्या खांद्यावर, उजव्या पायाच्या घोट्यावर आणि इतर ठिकाणी मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीमध्ये मुलाची हाडे फॅक्चर झाली आहेत. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी मारहाण करणारे शिक्षक विकास घोगरे व कर्मचारी सुभाष ठोकळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.