मुंबई – सोशल माध्यमातून महिलांचे खाजगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन महिलांकडून पैसे उकळणाऱ्या एका तरुणाला गोरेगाव पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली. गोरेगाव पोलिसांनी आरोपी राजवीर सिंगला आरे कॉलनीतून अटक केली असून हा तरुण महिलांना स्वतःची ओळख राजस्थानी शाही कुटुंबातील वारस अशी करून देत असे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी राजवीर सिंग याची गुन्हे करण्याची एक वेगळीच पद्धत होती. तो सोशल मध्यामत राजस्थानच्या महालातील स्वतःचे फोटो अपलोड करत असे. यानंतर तो महिलांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत असेल त्यातील अनेक महिला त्याला राजस्थानचा शाही वारस म्हणून त्याच्या मैत्रीची ऑफर स्वीकारत होत्या. यावर अनेक महिलांशी दोस्ती करून प्रेमाची बतावणी करून त्यांचे खाजगी फोटो मागत असे याच फोटोंचा वापर तो वसुली करण्यासाठी वापर करत असे.
गोरेगाव पोलीस ठाणे हद्दीत राहणारी ३० वर्षीय तक्रारदार महिला या टिकटॉक स्टार याच्या जाळ्यात फसली होती. आरोपीने तिच्याकडे देखील पैशाची मागणी केली. सुरुवातीला पीडितेने त्याला चार लाख रुपये दिले. मात्र तो वारंवार पैसे मागू लागल्यानंतर पैसे न दिल्याने तो तिला फोटो सोशल माध्यमातून वायरल करण्याची धमकी देऊ लागला होता. यालाच कंटाळून महिलेने गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.