पुणे : बीग बी अमिताभ बच्चन, ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांची घरे बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्या एकाला लोणीकंद (ता. हवेली) येथून अटक करण्यात आली आहे.
राजेश कडके (वय-२०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी राजेश कडके हा दिव्यांग असल्याची माहिती मिळत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता.२८) दुपारी पावणे चारच्या सुमारास आरोपी राजेश कडके याने नागपूर पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन केला होता. ”मुंबईतील शिवाजी पार्क येथे ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’या मालिकेतील दिलीप जोशी यांच्या घरासमोर नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. यामध्ये २५ जणांकडे बंदुका आणि बॉम्ब असून ते मुकेश अंबानी, बच्चन आणि धर्मेंद्र यांच्या घराजवळ स्फोट करुन शकतात.” असे त्याने पोलिसांना सांगितले होते.
याची माहिती नागपूर पोलिसांनी मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला दिली होती. मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता, ही माहिती खोटी असल्याचे निष्पन्न झाले.त्यामुळे अफवा पसरवून भीतीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात बुधवारी (ता.१) गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान, मुंबई पोलिस तपास करीत असताना, पोलिसांनी फोन ट्रेस करण्यास सुरुवात केली. त्यावेळी आरोपीचे लोकेशन पुण्यात सापडले. त्यानंतर मुंबई पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपी राजेश कडके याला लोणीकंद येथून अटक केली आहे. आरोपी राजेश कडके याने हा धमकीचा फोन का केला होता. याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पुढील तपास मुंबई पोलीस करीत आहेत.