लोणी काळभोर (पुणे) : शालेय विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या तिघांना पालकांनी धो-धो धुतल्याची घटना घडली आहे. पुणे-सोलापुर महामार्गावरील कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील एंजेल हायस्कूल परिसरात आज मंगळवारी (ता. ०४) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घटना घडली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी एकास ताब्यात घेतले असून आणखी दोघेजण तेथून पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर महामार्गावर लोणी स्टेशन परिसरातील संभाजीनगर येथील बस थांबा या ठिकाणी हडपसरसह विविध ठिकाणी महाविद्यालयात जाण्यासाठी शेकडो मुली थांबतात. यावेळी सदर ठिकाणी असलेल्या एका हॉटेलमध्ये काम करणारी तीन मुले मागील तीन महिन्यांपासून मुलीची छेडछाड करीत होते. ज्या ठिकाणी मुलगी जात असेल त्या ठिकाणी तिचा पाठलाग करणे, वेगवेगळ्या भाषेत बोलणे, डायलॉग बोलणे, तसेच रिक्षात बसून तिच्याबरोबर जाण्याचा प्रयत्न करणे हि सदर गोष्ट मुलीने तिच्या वडिलांना सांगितली होती.
त्यानुसार तिच्या पालकांसह जमावाने मंगळवारी सकाळी मुलांना चोप दिला आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलिसांनी तात्काळ हालचाली करत एकाला ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, याबाबत माहिती देताना मुलीचे पालक म्हणाले, मागिल तीन महिन्यांपासून मुलीला या परिसरात राहणारे तिघेजण मुले त्रास देत होती. मुलीने याबाबत माहितीहि दिली होती. वारंवार घटना होत असल्याने ही बाब कदमवाकवस्ती येथील सामाजिक कार्यकर्ते यांना सांगितली होती. त्यानुसार सदर ठिकाणी पालकांनी मुलांना पकडून चांगलाच चोप दिला.