लोणी काळभोर, (पुणे) : शेजारी राहणाऱ्याची कुत्र्याने कोंबडी पळवली याचा जाब विचारायला गेलेल्या कोंबडी मालकाला ८ जणांनी कोयता, लाकडी दांडक्याने व हातांनी जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. हि घटना लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील रुपनर वस्ती येथे गुरुवारी (ता. २२) रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
याप्रकरणी धनंजय बाळासाहेब विरकर (वय ३१, रा. रुपनर वस्ती, लोणी काळभोर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार लोणी काळभोर पोलिसांनी ८ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दोघांना अटक केली आहे.
अनिकेत रवींद्र काळभोर (वय- २१), रवींद्र काळभोर (वय-५५ रा. दोघेही लोणी काळभोर, ता. हवेली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर मंगेश काळभोर (वय-४२) व त्याच्या इतर ४ ते ५ साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनंजय विरकर आणि व आरोपी अनिकेत काळभोर हे दोघे शेजारी-शेजारी रहायला आहेत. विरकर यांची कोंबडी आरोपी अनिकेत काळभोर यांच्या कुत्र्याने पळवून नेली होती. याचा जाब विचारण्यासाठी विरकर हे अनिकेतच्या घरी गेले होते. तेव्हा आरोपीने विरकर यांना शिवीगाळ करुन बघून घेण्याची धमकी दिली.
त्यानंतर आरोपी अनिकेत काळभोर याने इतर आरीपींना जमवून गुरुवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास शेताच्या बांधाचा जुना वाद उकरुन काढत धनंजय विरकर यांच्या घरावर हल्ला केला. या हल्ल्यात आरोपींनी वीरकर यांना कोयता व लाकडी दांडक्याने मारहाण करुन जखमी केले. यावेळी भांडणे सोडवण्यासाठी गेलेली वीरकर यांची पत्नी प्राजक्ता व बहिण रुपाली यांनाहि या टोळक्याने मारहाण केली.
दरम्यान, लोणी काळभोर पोलिस ठाण्यात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी आरोपी अनिकेत आणि रवींद्र काळभोर यांना अटक केली आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मोरे करीत आहेत.