यवत : पारगाव (ता.दौंड) ग्रामपंचायत हद्दीतील भीमा नदी पात्रात मागील सहा दिवसांपासून सापडलेल्या ७ मृतदेहांचे गुपीत उलगडण्यात जिल्हा ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला अखेर यश आले आहे.
जिल्हा ग्रामीण पोलिसांच्या तपासात या सात जणांची आत्महत्या नाही तर मागील तीन महिन्यापूर्वी वाघोली येथील अपघातात मुलाचा अपघाती मूत्यू नसून तो खून केल्याच्या संशयावरूनच चुलतभावांनीच सामुहिक हत्या केल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी ५ नातेवाईकांना अटक केली आहे.
अशोक कल्याण पवार (वय ३९) शाम कल्याण पवार (वय ३५) शंकर कल्याण पवार, (वय ३७) प्रकाश कल्याण पवार (वय २४) आणि कांताबाई सर्जेराव जाधव (वय ४५, सर्व रा. ढवळेमळा निघोज ता. पारनेर जि. अहमदनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
तर मोहन उत्तम पवार (वय ४५), पत्नी संगिता उर्फ शहाबाई मोहन पवार (वय ४०, दोघेही रा. खामगाव ता. गेवराई जि. बिड ), मुलगी राणी शाम फलवरे (वय २४), जावई शाम पंडीत फुलवरे (वय २८), नातू रितेश उर्फ भैया शाम फलवरे (वय ०७), छोटु शाम फलवरे (वय ०५) व कुष्णा शाम फलवरे (वय ०३ सर्व रा. हातोला ता. वाशी ता. वाशी जि. उस्मानाबाद) अशी एकूण खून झालेल्या ७ जणांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरूर – चौफुला रोडवर असलेल्या पारगाव (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत भीमा नदी पात्रात स्थानिक मच्छिमार मासेमारी करत असताना बुधवारी (ता. १८) एका स्त्रीचा मृतदेह, शुक्रवारी (ता.२०) पुरुषाचा मृतदेह, शनिवारी (ता. २१) पुन्हा स्त्रीचा तर रविवारी (ता. २२) एका पुरुषाचा मृतदेह असे चार मृतदेह सापडले होते.
तर आता याच कुटुंबातील तीन लहान मुलांचे मृतदेह भीमा नदीच्या पात्रात मंगळवारी (ता.२४) दुपारी १ वाजण्याच्या सुमारास आढळून आले होते. शुक्रवारी (ता.२०) मिळालेल्या मयत महिलेजवळ एक मोबाईल फोन सापडला, त्यावरून मयत इसामंची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक गोयल यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. गोयल यांनी स्थानिक ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभाग व यवत पोलीस यांची पथके शोध मोहीमेसाठी तैनात केली होती. आणि सदर गुन्हाच तातडीने तपास करण्याच्या पोलिसांना सूचना दिल्या होत्या.
पोलिसांनी तपास सुरु केला असता, पोलिसांना माहिती मिळाली कि, मोहन पवार हे पत्नी संगिता उर्फ शहाबाई, मुलगी-राणी, जावई-शाम, नातु-रितेश, छोटु, कृष्णा व मुलगा अनिल यांच्यासह मागील १ वर्षापासुन निघोज (ता. पारनेर) येथे राहुन मजुरी काम करीत होते.
पोलिसांना तपासामध्ये आरोपी अशोक कल्याण पवार याचा मुलगा धनंजय याचा काही महिन्यांपुर्वी वाघोली येथे अपघाती मृत्यु झाला होता. त्या मृत्युमध्ये मृतक मोहन उत्तम पवार व त्याचा मुलगा अनिल मोहन पवार हेच जबाबदार आहेत. असा आरोपींना संशय होता. आणि त्याचा राग मनात होता. त्या कारणावरून बदला घेण्यासाठी धनंजयच्या कुटुंबीयांनी मोहन पवार यांच्या कुटुंबाचा काटा काढायचे ठरवले होते.
त्यानंतर मोहन आणि त्यांचे कुटुंबीय १७ जानेवारी रोजी भीमा नदीजवळ आल्यानंतर धनंजय याच्या घरच्यांनी त्यांची वाट अडवली. त्यांनी मोहन पवार, त्यांची पत्नी, मुलगी आणि जावयाला बेशुद्ध करुन त्यांच्यासोबत असलेल्या तीन मुलांनासह नदीत फेकले. आणि वरील सात जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.
दरम्यान, हा अपघात नसून मोहन पवार व त्यांच्या कुटुंबियांनी अमोलचा खून केल्याचा संशय मोहन पवार यांच्या चुलत भावांना असल्याने यातूनच वरील हत्याकांड घडविल्याची कुणकुण पोलिसांना लागली. व वरील हत्याकांडाचे गुड उलगडण्यास पोलिसांना यश आले आहे. त्यांनी सदरचा गुन्हा केला आहे. असे प्रथमदर्शनी पोलिसांच्या समोर आले आहे.
पोलिसांनी वरील पाचही आरोपींना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस उप विभागीय पोलीस अधिकारी राहुल धस करीत आहेत.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उप विभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या नेतृत्वाखाली खालील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कामगिरी केली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, व उपनिरीक्षक संजय नागरगोजे, सहाय्यक फौजदार तुषार पंदारे, हनुमंत पासलकर, मुकुंद कदम, काशीनाथ राजापुरे, पोलीस हवालदार सचिन घाडगे, राजु मोमीन, जनार्दन शेळके, अजित भुजबळ, मंगेश थिगळे, योगेश नागरगोजे, विजय कांचन, चंद्रकांत जाधव, प्रमोद नवले, निलेश शिंदे, पो. कॉ. धिरज जाधव, मंगेश भगत, तुषार भोईटे, अमोल शेडगे, दगडु विरकर, अक्षय सुपे, पोलीस हवालदार निलेश कदम, महेंद्र चांदणे, रामदास जगताप, अक्षय यादव, अजित काळे, प्रमोद गायकवाड.