लोणी काळभोर : फुरसुंगी (ता. हवेली) येथे एका २३ वर्षीय तरुणाचा बांधकामाच्या साईटवरील पाण्याच्या टाकीत मृतदेह आढळून आला. प्रेमप्रकरणाच्या संशयावरुन खून झाला असल्याचा तरुणाच्या आईला संशय आला होता. त्यानंतर तरुणाच्या आईने न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने तब्बल पावणे दोन वर्षानंतर दखल घेतल्यानंतर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बिभीषण माने, संजय हरिचंद्र माने, सचिन दगडु खोचरे, हनुमंत अंकुश कलढाणे (रा. गंगानगर, फुरसुंगी) यांच्यासह दोन महिला असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अरुणा महादेव काटकर (वय ४२, रा. सुंदरबन सोसायटी, फुरसुंगी) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अरुणा काटकर यांचा मुलगा निरंजन काटकर याचा मृतदेह स्वराज पार्क येथील बांधकामाच्या साईटवरील पाण्याचे टाकीमध्ये ४ एप्रिल २०२१ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास आढळून आला होता.
मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर डॉक्टरांनी पाण्यात बुडुन मृत्यु झाला असल्याचा अहवाल दिला होता. त्यानुसार लोणी काळभोर पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली होती.
दरम्यान, निरंजनचे एका तरुणीबरोबर प्रेमसंबंध होते. त्यावरुनच आरोपींनी निरंजनला पाण्याच्या टाकीत बुडवून खून केला आहे. असा संशय निरंजनच्या आईला आला होता. त्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने तब्बल पावणे दोन वर्षानंतर दखल घेतल्यानंतर १५६ (३) प्रमाणे खूनाचा गुन्हा दाखल करुन तपास करण्याचा आदेश दिले आहे.
याप्रकरणी अरुणा काटकर यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात सहा जणांच्या विरोधात खूनाचा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद हंबीर करीत आहेत.