पुणे : कोंढवा परिसरातील मेफेर सोसायटीच्या समोर असणाऱ्या मोकळ्या मैदानात महिलेचा खून झाला होता. हा खून महिलेने दारू मागताना झालेल्या वादविवादातून झाला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात गुन्हे शाखेच्या युनिट पाच व कोंढवा पोलिसांनी दोन आरोपीना अटक केली असून यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.
जैद आसिफ शेख (वय २०, रा. कोंढवा) आणि अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. तर खून झालेल्या महिलेचे नाव आजूनही समजू शकले नसून कोंढवा पोलीस तपास करीत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेफेर सोसायटीच्या समोरील मोकळ्या मैदानात ३५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला असल्याची माहिती कोंढवा पोलिसांना सोमवारी सकाळी मिळाली होती. गुन्हे शाखा आणि कोंढवा पोलीस तपास करत असताना संशयित आरोपी कौसरबाग भागात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
या माहितीच्या आधारे दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, आम्ही मोकळ्या जागेत झाडाआड बसलो होतो. तेव्हा तिथे आलेल्या महिलेने दारू द्या, म्हणून वाद घातला. भांडणात तिला धक्का मारल्याने ती खाली पडली. तिच्या डोक्यात दगडाने घाव केला. तिचा मृत्यू झाल्याच्या भीतीने आम्ही पळ काढला, अशी कबुली आरोपींनी दिली.
त्यानंतर आरोपी शेख यास अटक करण्यात आली. महिलेची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती युनिट पाचचे पोलीस निरीक्षक उल्हास कदम आणि कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) संजय मोगले यांनी दिली.