बारामती, (पुणे) : शहरातील जामदार रोडवरील खत्री पवार इस्टेटनजीक पती-पत्नीचा आर्थिक व्यवहारातून खून झाल्याने बारामतीत खळबळ उडाली. सचिन महालिंग वाघोलीकर (वय 44) व सारिका सचिन वाघोलीकर (वय 38, रा. खत्री पवार एन्क्लेव्ह, जामदार रोड, बारामती) असे या दाम्पत्याचे नाव असून, या दोघांचाही शनिवारी (ता. 13) सकाळी साडेअकराच्या सुमारास खून करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
एका युवकाने आर्थिक व्यवहाराच्या वादातून या दोघांवर हल्ला केला. त्यात त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा दोघांचे मृतदेह अक्षरशः रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. ऑनलाईन ट्रेडिंग करणाऱ्या युवकाकडून वाघोलीकर यांनी २० लाख रुपये घेतले होते. ते परत करण्यास टाळाटाळ करत होते. त्या वादातून चिडून जाऊन आरोपीने पती-पत्नीवर हल्ला करुन त्यांचा खून केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. वाघोलीकर यांचा बांधकाम व्यवसाय होता, त्यांना दोन मुलगे आहेत.
या झटापटीमध्ये आरोपीला देखील मार लागला असून, त्याच्यावरही रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज देशमुख व अतिरिक्त पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनीही घटनास्थळी जात माहिती घेतली. पोलिसांनी तातडीने चौकशी केल्यामुळे आरोपी पोलिसांच्या हाती लागला. या खूनामागे त्याच्या एकट्याचाच हात असून, इतर कोणाचा यात सहभाग नसल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचेही पोलिस सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड व पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वाघोलीकर दांपत्यास दोन मुले व एक मुलगी असून, ते तिघेही घटना घडली, त्यावेळेस घरात नव्हते अशी माहिती पोलिसांनी दिली.