पुदुच्चेरी : मुलीपेक्षा मुलीचा वर्गमित्र खूप हुशार असल्याने आईने विष पाजून हत्या केल्याची धक्कादायक घटना पुदुच्चेरीमधील कराईकल येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे.
जे. सगयरानी व्हिक्टोरिया (वय-४२) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तर बालमणिकंडन (वय-१३) असे मृत मुलाचे नाव आहे.
कराईकलचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक आर. लोकेश्वरन यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेची मुलगी आणि मृत बालमणिकंडन हे दोघे एकाच शाळेत इयत्ता आठवीच्या वर्गात शिक्षण घेत होते. बालमणिकंडन हा आरोपी महिलेच्या मुलीपेक्षा शैक्षणिक आणि अन्य सर्वच उपक्रमांमध्ये नेहमीच सर्वप्रथम येत होता. आपल्या मुलीपेक्षा बालमणिकंडन कायमच सरस ठरत असल्याने महिलेला त्याच्या द्वेष निर्माण झाला. आणि या द्वेषातून आरोपी महिलेने बालमणिकंडनचा काटा काढायचा ठरविला.
शाळेचे शुक्रवारी (२ सप्टेंबर) अॅन्युअल डे फंक्शन होते. या सोहळ्यातील सांस्कृतिक कार्यक्रमात बालमणिकंडनचा सहभाग होता. याचा फायदा घेऊन आरोपी महिलेने शाळेच्या वॉचमनची भेट घेतली. मी बालमणिकंडनची आई आहे. अशी आरोपी महिलेने बतावणी केली. आणि बालमणिकंडनला शीतपेयाच्या दोन
बाटल्या देण्यास सांगितले. सांस्कृतिक कार्यक्रमानंतर वॉचमनने त्या बाटल्या बालमणिकंडन दिल्या. त्यानंतर त्यातील पेय बालमणिकंड प्याला. त्यानंतर जेव्हा बालमणिकंड घरी पोहोचला, तेव्हा त्याला उलट्या व्हायला लागल्या. त्याच्या आई-वडिलांनी तातडीने त्याला एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथील डॉक्टरांनी उपचारांनंतर त्याला घरी सोडले. शनिवारी (३ सप्टेंबर) बालमणिकंडची प्रकृती पुन्हा एकदा बिघडली.
त्यानंतर त्याला कराईकलच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान शनिवारी रात्री त्याची प्राणज्योत मालवली.
दरम्यान, मृत्यूपूर्वी बालमणिकंडनने आईला सांगितले होते कि, तू वॉचमनकडे पाठवलेले शीतपेय प्यायल्यानंतर आपल्याला असे व्हायला लागले आहे. बालमणिकंडनच्या आईने तर काहीच पाठवले नव्हते. त्यामुळे यात काहीतरी घोटाळा आहे. असा संशय बालमणिकंडनच्या आईला आला. त्यामुळे तिने कराईकल पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी सगळ्या घटनांचा छडा लावून शनिवारीच आरोपी महिलेला अटक केली.
पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, आरोपी महिलेने सदर गुन्ह्याची पोलिसांना कबुली दिली आहे.