पुणे : शहारतील लोहगावमधे सासूने सुनेचा खून केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. घरकाम जमत नाही तसेच ती नातवाला व्यवस्थित सांभाळत नसल्याचा आरोप करत सासूने सुनेचे डोके फरशीवर आपटून तिचा खून केला आहे. ही घटना लोहगावमधील कलवड वस्तीत ६ मार्च रोजी पहाटे ३ वाजता घडली. या घटनेनंतर परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान एकीकडे महिलादिन साजरा केला जात आहे तर दुसरीकडे महिला अत्याचाऱ्यांच्या घटना घडत आहेत.
रितु रवींद्र माळवी (वय २८) असे खून करण्यात आलेल्या सुनेचा नाव असून कमला प्रभुलाल माळवी (वय ४९, रा. कलवड वस्ती, लोहगाव) असे सासूचे नाव आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी सासूला अटक केली आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक समु चौधरी यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगा रवींद्र याने रितु यांच्याशी १० वर्षापूर्वी प्रेमविवाह केला होता. यास सासू कमला माळवी हिचा विरोध होता. रितू, रवींद्र यांना एक मुलगाही आहे. १० वर्षानंतरही कमला यांच्या मनात हा राग कायम होता. त्यावरुन त्या नेहमी सुनेशी भांडणे करीत असत. रितूला घरकाम जमत नाही तसेच ती नातवाला व्यवस्थित सांभाळत नसल्याचा आरोप करुन सासू कमला तिचा छळ करत होती. दोन दिवसांपूर्वी स्वयंपाकघरातील फ्रीज उघडताना रितूला पाय लागल्याने वाद झाला होता. त्यावरुन सुनेने त्यांना शिवीगाळ केली. त्याचा राग आल्याने सासूनेही तिला शिवीगाळ करीत मारहाण केली. त्यानंतर कमलाने रितूला मारहाण केली. तिचे डोके फरशीवर आपटले. या घटनेत रितूच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. शवविच्छेदनात डॉक्टरांनी डोक्यात अंतर्गत रक्तस्त्राव होऊन तिचा मृत्यू झाल्याचा अहवाल दिला.
दरम्यान, झोपेत असताना सुन कॉटवरुन पडल्याने तिच्या डोक्याला लागून तिचा मृत्यू झाल्याचे सासु सांगत होती. मात्र, ते सांगताना ती गडबडल्याने पोलिसांना संशय आला. त्यानंतर पोलीसांनी सासू कमलाची चौकशी केली. दोघींची नेहमी भांडणे होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तेव्हा तिने सुनेला बेदम मारहाण करुन तिचा खून केल्याची कबुली दिली. पुढील तपास पोलीस करत आहेत.