पुणे : जन्मदात्या आईने अल्पवयीन मुलीचे लग्न स्वत:च्याच प्रियकराशी लावून दिल्याची घटना वडगावशेरी (ता. हवेली) परिसरात घडली आहे.
याप्रकरणी पुण्यातिक चंदननगर पोलिसांनी महिला व तिच्या प्रियकराला अटक केली आहे. चंद्रकला शहादेव मखर (वय-३६) व तिचा प्रियकर सागर जयराम दातखिळे (वय-२८, मूळ रा.उस्मानाबाद ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
चंदननगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चंद्रकला आणि आरोपी सागर यांची एका लग्न सोहळ्यात ओळख झाली होती. त्या दोघांचे ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर या नात्याची माहिती पीडित १५ वर्षीय मुलीला झाली.
आरोपी आईने सागर दातखिळे याच्याशी लग्न कर, नाहीतर मी जीव देईन, अशी धमकी देत सातत्याने मुलीवर दबाव टाकत पीडित मुलीचा विवाह आपल्या प्रियकराशी लावून दिला आहे.
या भीतीपोटी १५ वर्षीय मुलीने आरोपी सागर जयराम दातखिळे याच्या सोबत २०२२ मध्ये विवाह केला. त्यानंतर आरोपीने तिच्यावर बलात्कार केला.
दरम्यान, या प्रकाराबाबत पीडित मुलीने तिच्या शाळेतील मित्राला संपूर्ण अत्याचाराची माहिती दिली. त्यानंतर या घटनेची माहिती त्याच परिसरातील एका महिलेला मिळाली आणि हे प्रकरण उघडकीस आले. संबंधित महिला पीडित मुलीला चंदननगर पोलीस ठाण्यात घेऊन आल्या.
यानंतर पीडित मुलीने तक्रार दिली व आरोपी सागर जयराम दातखिळे आणि आरोपी आई चंद्रकला शहादेव मखर या दोघांविरोधात बलात्कार, बालविवाह प्रतिबंधक अधिनियम कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास चंदननगर पोलिस करीत आहेत.