शिरुर : १० गुंठे जागा देण्याचे आमिष दाखवून शिरूर (जि. पुणे) येथील माऊली सहकारी गृहरचना संस्था मर्यादित या संस्थेतील सभासदांची तब्बल १ कोटी ६ लाखांची फसवणूक केल्याची धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात ४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परेश नागनाथ सुपते, दत्तात्रय सिध्दु आढाव, संजय मच्छिंद्र गटकळ, नामदेव सिताराम गावडे (सर्व रा. शिरूर, ता. शिरूर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सतिश रामदास आंधळे (रा. शिरूर) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सदर प्रकार हा १० डिसेंबर २०२० पासून आजपर्यंत घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सतिश आंधळे यांना वरील चारही आरोपींनी शिरुर नगरपालीका हददीतील सर्व्हे नं. ५४ मधील १० गुंठे जागा खरेदीखताने खरेदी करून देतो. असे संगनमत करून सांगितले. व आंधळे यांना विसारपावती करुन देवून त्यांच्याकडुन तब्बल १ कोटी ६ लाख रूपये घेतले.
त्यानंतर आरोपींनी त्यातील काही पैसे जागेचे मुळ मालक गायत्री संतोष पटवा यांचे खात्यावर टाकले आणि ते पैसे कागदावर सापडू नये म्हणून गायत्री पटवा यांच्या खात्यावरून ते पैसे आरोपी सुपते याने ओळखीच्या लोंकाच्या अकाऊंटला पाठवून दिले आणि त्यांच्याकडून आरोपीने पैसे रोख स्वरूपात घेतले.
दरम्यान, आरोपी सुपते याने जागेचे खरेदीखत करून दिली नाही. यामुळे माउली सहकारी गृहरचना संस्था मर्या शिरूर यामधील सभासदांची आरोपींनी १ कोटी ६ लाख रूपयाचा अपहार करून फसवणूक केली आहे.
याप्रकरणी सतिश आंधळे यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ४ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अभिमन्यू पवार करीत आहेत