पुणे : जादा परतावा देण्याचे आमिष दाखवत महिलांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. गुंतवणूक केल्यास शंभर दिवसात ५० लाखांच्या बदल्यात ८० लाख रुपये देण्याची बतावणीकरून चार महिलांची फसवणूक केली आहे. जादा परताव्याचे आमिष या महिलांना चांगलेच महागात पडले आहे.
याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात श्रीकांत रामाचार होलेहुन्नर व नितीन विलास कोष्ठी (वय ४२) यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत एका २६ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. हा प्रकार फेब्रुवारी २०२२ ते फेब्रुवारी २०२३ या कालावधीत घडला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांच्यासोबतच इतर तीन महिलांना श्रीमंत बाजार कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास शंभर दिवसात जादा परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. त्यांच्याकडून ५० लाख २५ हजार रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. परंतु, शंभर दिवसानंतर परताव्यासह ८० लाख ४२ हजार रुपयांचा ऐवज परत न देता त्यांची फसवणूक केली. पुढील तपास कोंढवा पोलीस करत आहेत.