पुणे : विजयस्तंभाला १ जानेवारीला अभिवादन करण्यासाठी आलेल्या भाविकांचा गर्दीचा फायदा चोरट्यांनी घेऊन नागरिकांच्या गळ्यातील दागिने लंपास केले आहेत. वेगवेगळ्या पाच घटनांमध्ये सुमारे ३ लाख रुपयांचे ११ तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरले आहेत.
याबाबत मंगळवार पेठेतील महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली आहे.
फिर्यादी महिला पतीसह १ जानेवारी रोजी विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेल्या होत्या. अभिवादन करून त्या पेरणे टोलनाका येथील बस स्थानकावर आल्या. बसमध्ये चढत असताना चोरट्याने गर्दीचा फायदा घेत त्यांच्या गळ्यातील गंठण चोरले. बसमध्ये चढल्यावर त्याच्या ही बाब लक्षात आली.
त्यांनी लोकांकडे विचारपूस करण्यास सुरुवात केली. त्यावेळी बसथांब्याजवळ थांबलेल्या लोकांचा गोंधळ सुरु होता. त्यांच्याकडे चौकशी केली असता, आणखी एका महिलेच्या गळ्यातील गंठण चोरीला गेल्याचे उघड झाली. याशिवाय शाहूवाडी, हडपसर, काळेपडळ येथील दोन तरुणांच्या गळ्यातील सोनसाखळी देखील लांबविल्याचे आढळून आले आहे.
चोरट्यांनी दोन गंठण व तीन सोनसाखळ्या असा ३ लाख २ हजार रुपयांचा ११ तोळे सोने चोरून नेल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लोणीकंद पोलीस करत आहेत.