पुणे : मटणाच्या सूपमध्ये भात आल्याच्या कारणावरुन दोघांनी वेटरला शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली या मारहाणीत १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. तर दोनजण जखमी झाले आहेत. हि घटना पिंपरी चिंचवड परिसरातील पिंपळे सौदागर येथे घडली.
मंगेश संजय पोस्ते (वय-१९) असे खून झालेल्या वेटरचे नाव आहे. अजित मुठकुळे (वय-३२), सचिन भवर (वय-२२) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी विजयराज वाघिरे आणि त्याच्या साथीदारावर सांगवी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विशाल महादू रजाळे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवडमधील पिंपळे सौदागर येथील मटण खानावळीत आरोपी हे नेहमी जेवण करण्यासाठी येतात. मंगळवारी (ता. १५ ) मटणाच्या सुपामध्ये भात आला. यावरुन आरोपींनी वेटर अजित मुठकुळे, सचिन भवर आणि मयत मंगेश यांना शिविगाळ करत लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली.
दरम्यान, हॉटेलची सर्व्हिस, जेवण योग्य नसल्याचे म्हणत आरोपींनी तिघांना बेदम मारहाण केली. यात मंगेश याचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. पुढील तपास सांगवी पोलीस करीत आहेत.