मुंबई : विरार येथील आयसीआयसीआय बँक दरोडा व हत्या प्रकरणात अटकेत असणारा बँकेचा माजी व्यवस्थापक अनिल दुबे हा पोलिसांच्या तावडीतून फरार झाला आहे. आरोपी अनिल दुबे याला वसई सत्र न्यायालयात हजार केले असताना तो पोलिसांना चकवा देऊन फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
विरार पूर्व येथील आयसीआयसीआय बँकेत जुलै २०२१ रोजी दरोडा पडला होता. यात आरोपी अनिल दुबेने महिला व्यवस्थापक योगिता चौधरीची हत्या व श्वेता देवरुखकर यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. दरोडा व हत्या करून पळून जाताना त्याला स्थानिक नागरिकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले होते.
कर्जबाजारी झालेल्या आणि बँकेत माजी व्यवस्थापक असलेल्या अनिलकुमार राजीव दुबे याने बँकेतच दरोडा टाकला होता. दरोडा व हत्येच्या गुन्ह्यात तो ठाणे तुरुंगात होता. काळ दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास त्याला वसई सत्र न्यायालयात तारखेला हजर करण्यासाठी आणले असता तो पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाला.