पुणे : कौटुंबिक संबंध सलोख्याचे असल्याने, काही काळासाठी वापरण्यास दिलेल्या जागेची खोटी कागदपत्रे तयार करुन एका ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक केल्याचा प्रकार पुण्यातील पर्वती परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी बाप-लेकांवर पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २०१३ ते सप्टेंबर २०२३ दरम्यान पर्वती येथील अरुणोदय सहकारी गृहसंस्था येथे घडला आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, संजय श्रीनिवास देशपांडे (वय ६५, सध्या रा. पर्वती, मुळ रा. अमेरिका) यांनी पर्वती पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, बाळासाहेब त्रिंबक चव्हाण, प्रकाश बाळासाहेब चव्हाण (दोघे रा. अरुणोदय सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या. पर्वती, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी यांचे वडील एकमेकांच्या परिचयाचे होते. आरोपी सुमारे ४० वर्षांपूर्वी पुण्यात कामानिमित्त आले होते. त्यावेळी फिर्यादीच्या वडिलांनी कौटुंबिक संबंधामुळे आरोपींना बंगल्यामधील गॅरेज राहण्यासाठी व वापरण्यासाठी दिले होते.
दरम्यान, कौटुंबिक संबंध जिव्हाळ्याचे असल्याने, कोणताही करारनामा न करता ही जागा आरोपींना तात्पुरती वापरासाठी दिली होती. आरोपींनी जागा बळकावण्याच्या उद्देशाने संगनमत करुन, फिर्यादीच्या आईचा बनावट करारनामा तयार केला. आरोपींनी फिर्यादी यांच्या आईने यापूर्वीच जागा विकल्याचे भासवून, फिर्यादीचे बनावट संमतीपत्र तयार करुन, मिळकत विकण्यास संमती असल्याचे भासवून मिळकतीचे खोटे दस्तऐवज तयार केले.
या प्रकरणी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, फिर्यादींनी न्यायालयात दावा दाखल केला. आरोपींनी आई व फिर्यादीची खोटी कागदपत्रे तयार करुन, फिर्यादीची ८ कोटी रुपयांच्या ६३४३ स्क्वेअर फूट मिळकतीवर कब्जा करुन, फिर्यादीची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.