पुणे : वडिलांना एका महिलेसोबत मुलीने रंगेहाथ लॉजवर पकडल्याची धक्कादायक घटना कुडजे (ता. हवेली) येथे बुधवारी (ता.२८) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. रंगेहाथ पकडल्यामुळे चिडलेल्या वडील व त्यांच्या प्रेयसीने मुलीला मारहाण करताना लॉजमधील खोलीत कोंडून रफुचक्कर झाले आहेत.
याप्रकरणी किरकटवाडी येथील २८ वर्षाच्या तरुणीने उत्तमनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार वडिल आणि त्यांच्या प्रेयसीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडिल कर्वेनगर येथे राहणार्या एका महिलेची ओळख आपली बहिण असल्याची सांगत होते. मात्र फिर्यादी यांना त्यांच्या संबंधाविषयी संशय होता. त्यामुळे ती आपल्या वडिलांच्या नेहमी पाळतीवर असायची.
दरम्यान, वडील आणि संबंधित महिला कुडजे येथील साहील लॉजवर बुधवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास गेले होते. तेव्हा मुलगी तेथे गेली आणि दोघांनाही रंगेहाथ पकडले. ही तुमची बहिण आहे, असे आम्हाला सांगता मग तिला लॉजवर आणून काय करताय, असे वडिलांना तिने विचारले. तेव्हा तिच्या वडिलांनी तिच्या हातातील मोबाईल हिसकावून घेऊन रिलिंगवर आपटून फोडला.
त्यानंतर वडील व त्यांच्या प्रेयसीने मुलीला शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. दोघांनीही मुलीला रुममध्ये बंद करुन पळून गेले. हा प्रकार लॉजमधील कामगार पहात होती. या दरम्यान, फिर्यादी यांचा छातीजवळ हात घालून शर्ट फाडल्यामुळे कामगारासमोर हा प्रकार घडला. त्यामुळे फिर्यादी यांच्या मनास लज्जा उत्पन्न झाली.
याप्रकरणी २८ वर्षाच्या तरुणीने उत्तमनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार वडिल आणि त्यांच्या प्रियसीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास उत्तमनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पवार करत आहेत.