पुणे : मुलाच्या अकाली निधनाच्या धक्क्याने वडिलांनी देखील प्राण सोडल्याची घटना घडली असून यामुळे संपूर्ण कुटुंबावरच दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
नांदेड सिटी येथे महावितरण मधून निवृत्त झालेले दिलीप सातपुते मुलासह राहत होते. दिलीप यांचा मुलगा चिन्मय संगणक अभियंता असून विमान नगर येथील एका कंपनीत चांगल्या पदावर कार्यरत होता.
मात्र, बुधवारी चिन्मय यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. घरातील महत्वाचा दुवा निखळल्याचा धसका घेत दिलीप यांनी देखील प्राण सोडले.
चिन्मय याला बॅडमिंटन आणि पोहण्याची प्रचंड आवड होती. उत्कृष्ट जलतरणपटू म्हणून तो परिसरात परिचित होता. तर दुसरीकडे दिलीप यांचा स्वभाव शांत, हळवा. आपल्या नातवंडासोबत ते आनंदाने आयुष्य घालवत होते. मात्र चिन्मय हा एकुलता एक मुलगा असल्याने त्याच्या निधनाचा धक्का ते सहन करून शकले नाहीत.
त्याच्या विरहाने त्यांनी प्राण सोडले आहेत.दरम्यान, सातपुते कुटुंबात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबावर मोठा आघात झाला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.