चाकण : मेदनकरवाडी ( ता. खेड ) येथून काल बेपत्ता झालेल्या चार वर्षीय चिमुरडीचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत सापडला असून, मृतदेहाचा कमरेखालचा अवयव व एक पाय गायब असून एक पाय पिरगळलेल्या अवस्थेत आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
कृष्णा सतेन्द्र ठाकूर ( वय ४ वर्षे ४ महिने ) असे मृत बालिकेचे नाव आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजले नाही. दरम्यान मृत्यूपूर्वी चिमुरडीवर अत्याचार झाला आहे का हे पडताळण्यासाठी मृतदेह पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात फॉरेन्सिक एक्स्पर्टकडे पाठविण्यात आला आहे. वैद्यकीय अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण समजू शकणार आहे.
दरम्यान मावळात सात वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करुन , तिचा खुन केल्याची घटना दहा दिवसापुर्वी घडली होती. ही घटना ताजी असतानाच वरील धक्कादायक बाब पुढे आल्याने जिल्ह्यासह राज्याभऱात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा सतेन्द्र ठाकूर ही काल दुपारी एक वाजलेपासुन गायब होती. कृष्णाची आई नेहा सत्यद्र कुमार ठाकूर (वय – २७, सध्या रा. भगतवस्ती, मेदनकरवाडी, चाकण, ता. खेड, जि. पुणे, मुळगाव भोजापूर, ता. भैरिया, जि. बलिया, उत्तर प्रदेश ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाकण पोलसांनी, कृष्णाला अज्ञात व्यक्तीने पळुन नेल्याबाबतचा गुन्हा चाकण पोलीस ठाण्यात दाखल केला होता.
दरम्यान गुरुवारी (ता. ११) सकाळी मेदनकरवाडीहुन चाकणकडे कामावर जाणाऱ्या कामगारांना, एका मुलीचा विवस्त्र असेलेला मृतदेह छिन्न विच्छिन्न अवस्थेत दिसून आला. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी सकाळी ठिक ९:१५ वाजताच्या दरम्यान मिळून आलेल्या मृतदेहाबद्दल चाकण पोलीस ठाण्याला माहिती दिली. त्यानंतर तात्काळ चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून मुलीचा मृतदेह शिवविच्छेदनसाठी प्रथम चाकण ग्रामीण रुग्णलयात नेला.
घटनास्थळी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्यासह चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे, पोलीस निरीक्षक देवडे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची सविस्तर माहिती घेऊन पोलिसांनी घटना स्थळाचा पंचनामा केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड करत आहेत.