शिरूर : लोणीकंद जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेल्या मुख्यध्यापकांचा मृतदेह एका विहरीत संशयास्पद परिस्थितीत आढळून आल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. हनुमंत रामदास हरेल (वय – ५३) रा. एकनाथ पठारे वस्ती, चंदननगर पुणे मूळ रा. हिवरे कुंभार (ता. शिरूर) असे मृतदेह सापडलेल्या मुख्यध्यापकांचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हिवरे कुंभार (ता. शिरूर) येथील मुळचे रहिवाशी असलेले हनुमंत हरेल हे लोणीकंद (ता. हवेली) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक पदावर कार्यरत होते. सोमवारी (ता. ०५) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास शाळेतून निघून गेले होते.
परंतु घरी देखील परतले नाहीत. त्यामुळे नृसिंहवाडी येथे दत्त जयंतीसाठी गेले असावे असे त्यांच्या कुटुंबियांना वाटले मात्र ते घरी न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
सदर घटनेचा तपास लोणीकंद पोलीस करीत असताना रविवारी (ता. ११) हिवरे कुंभार ग्रामपंचायत हद्दीत एका शेतात दुचाकी उभी असल्याचे दिसून आले. तसेच शेजारी असलेल्या विहिरीमध्ये एका इसमाचा मृतदेह असल्याचे काही नागरिकांना दिसले. याबाबतची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली असता शिक्रापूर पोलिस तात्काळ सदर ठिकाणी पोहोचले.
दरम्यान, सदर ठिकाणी जाऊन मृतदेहाची पाहणी केली असता सदरचा मृतदेह हा हनुमंत हरेल यांचा असल्याचे दिसून आले. याबाबत शशी हनुमंत हरेल (वय ३२) रा. एकनाथ पठारे वस्ती, चंदननगर, मूळ रा. हिवरे कुंभार (ता. शिरूर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात खबर दिली होती.
शिक्रापूर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून हरेल यांची आत्महत्या कि हत्या याबाबत काहीही माहिती मिळू शकली नसून पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मंगेश लांडगे हे करत आहेत.