आळेफाटा : शिक्षकांवर शेरोशायरी केल्याच्या गैरसमजातून आकरावीच्या विद्यार्थ्याला अमानुषपणे लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याप्रकरणी आळे (ता. जुन्नर) येथील ज्ञानमंदिर हायस्कूल आणि कॉलेजचे उपप्राचार्य व शिपायाविरुध्द आळेफाटा पोलीस ठाण्यात शनिवारी (ता.२१) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपप्राचार्य जयसिंग जाधव व शिपाई सोमनाथ कुऱ्हाडे असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस जवान अमित मालुंजे यांनी आळेफाटा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानमंदिर हायस्कूल आणि कॉलेजच्या आवारात शिक्षकांकडे पाहून शेरोशायरी केल्याच्या गैरसमजातून शिक्षक आणि शिपायाने शनिवारी (ता.२०) एका १७ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थी शिवीगाळ करून हाताने लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली होती. या मारहाणीचा व्हिडिओ एका विद्यार्थ्याने काढला होता. आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हारायल झाला होता. त्यानंतर पालकांकडून शिक्षकांच्या विरोधात रोष निर्माण झाला आहे.
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पालकांनी शनिवारी विद्यालयात येत शिक्षक आणि शिपायला निलंबित करण्याची मागणी केली. त्यानंतर ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष भाऊशेठ कुन्हाडे यांनी संबंधितावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. मात्र पीडित मुलाच्या नातेवाईकांनी संबंधितांच्या विरोधात तक्रार देण्यास असमर्थता दाखविली होती.
दरम्यान, मुलाच्या नातेवाईकांनी सबंधिताविरोधात तक्रार देण्यास असमर्थता दाखविल्यानंतर सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस जवान अमित मालुंजे यांनी आळेफाटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार उपप्राचार्य जयसिंग जाधव व शिपाई सोमनाथ कुऱ्हाडे यांच्या विरोधात भादवी कलम ३२३, ५०४, ३४, सह बाल न्याय अधिनियम काळजी व संरक्षण २०१५ चे कलम ७५, बाल न्याय अधिनियम मुलांची काळजी व संरक्षण २००० चे कलम २३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल पवार करत आहे.