अजित जगताप
सातारा : सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलने करणारे कार्यकर्ते म्हणजे वडूज नगरीचे जेष्ठ नागरिक श्री अशोक बैले असे समीकरण झाले आहे. त्यांच्या कुटुंबातील सदस्य काही कामानिमित्त परगावी गेल्याची संधी साधून चक्क त्यांच्या दारातील लोखंडी पिंजरा रातोरात गायब करण्यात आला आहे. याची आता खमंग चर्चा होऊ लागली आहे.
वडूज नगरीतील महिला माजी सरपंच सौ कांताबाई बैले, त्यांचे सुपुत्र नगरसेवक तुषार बैले व नातू तसेच श्री अशोक बैले हे वडूज नगरीत राहत आहेत. सौ कांताबाई बैले यांच्या गुढग्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी घरातील काही कुटूंब परगावी गेले होते. यावेळी वडूज येथील घरात फक्त वयोवृद्ध श्री अशोक बैले हे एकटेच आहेत. ते घरी असताना त्यांच्या दारातील कुत्र्यासाठी तयार केलेला लोखंडी जाळीदार पिंजरा अज्ञातांनी रातोरात्र गायब केल्याची माहिती दस्तुरखुद्द अशोक बैले यांनी दिली आहे.
त्यांनी अद्याप वडूज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली नाही. कोणीतरी गैरसमजुतीने असे कृत्य केले असावे असा त्यांचा समज झाला आहे .परंतु,जाणकार रहिवाश्यांनी माहिती दिली की, काही भागात व्यसन व नशापान करणाऱ्या व्यसनी लोकांना वस्तू चोरणे, कमी किंमतीत विकणे, ही नित्याची बाब बनली आहे. सदरचा पिंजरा हा साडेचार बाय चार फूट आकाराचा असून साधारण पावणे दोन वर्षांपूर्वी सुमारे सहा हजार रुपये खर्च करून तो पिंजरा तयार करण्यात आला होता. तो गायब झाल्याने सर्वत्र नवल वाटत आहे.
वडूज नगरीत पोलीस यंत्रणा गस्ती घालत आहेत. तरी ही चोरीचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांनी ही सतर्क राहून या चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे महिला व जेष्ठ नागरिकांनी सूचित केले आहे. वडूज नगरीत धार्मिक स्थळा सोबतच सि. सि. टि .व्ही. कॅमेरा बसविण्यात यावा अशी ही मागणी करण्यात आली आहे.रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेऊन अनेक छोट्या मोठ्या चोऱ्या होत असून वडूज नगरीत इतर जिल्हा व राज्यातून मोठ्या प्रमाणावर लोक राहत आहेत.त्याकडेही काहींनी लक्ष वेधून घेतले आहे.