बुलढाणा : कर्तव्य बजावून रात्री देऊळगाव राजा येथे विसाव्यासाठी राज्य परिवहन महामंडळाची बस चोरीला गेल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा बस स्थानकात घडली.
विश्रांती कक्षात चालक आणि वाहक झोपलेले असताना अज्ञात चोरट्याने बस चोरून नेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर प्रशासनाची नुसती पळापळ सुरु होती.
रविवारी महामंडळाची एम एच ०७ सी ९२७३ ही बस रात्री देऊळगाव राजा येथे मुक्कामासाठी थांबली होती. कर्तव्य बजावून आलेले चालक आणि वाहक हे दोघेही विश्रांती कक्षात झोपले असताना मध्यरात्री अडीच ते तीनच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने बस सुरु करत पळवून नेली.
मानव विकास मिशनची बस पहाटे स्थानाकात नसल्याचे लक्षात येताच प्रशासनाने शोधाशोध सुरु केली. याची तक्रार बसच्या चालकाने पोलीस स्टेशनला दिल्यावर हा प्रकार उकडीस आला.
थेट बस स्थानकातून बस गायब झाल्याने अधिकारी देखील हैराण झाले. पोलीस आणि महामंडळाच्या अधिकाऱ्यानी बसची शोधाशोध सुरु केली. बस स्थानकापासून सुरु झालेली बस आखेल चिखली मार्गावर दोन किलोमीटर अंतरावर सापडली.
चोरटा बस घेऊन पोबारा करताना चिखली मार्गावर एका गतिरोधकाला बसचा सेंट्रल जॉईंट निखळल्याने बस जागेवरच थांबली. त्यामुळे चोरट्याला बस तिथेच थांबवून पोबारा करावा लागला. मात्र, बस जवळच सापडल्याने वैतागलेले अधिकारी, चालक वाहक आणि पोलिसांचा जीव भांड्यात पडला.
पोलीस चोराचा शोध घेत असून महामंडळ कर्मचाऱ्यातील वादविवादांमुळे असा कृत्य केले असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. मात्र, चोरीच्या घटनेची चर्चा नागरिकांमध्ये काल दिवसभर सूरु होती.