पुणे : प्रेयसीसोबत नाते (ब्रेकअप) तुटल्याच्या रागातून प्रियकराने प्रेयसीच्या घरातून तब्बल २८ तोळे दागिने व रोख रक्कम असा १४ लाख ६७ हजारांचा मुद्देमाल पळवून नेल्याची घटना तपासादरम्यान उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरोपी प्रियकराला भारती विद्यापीठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सुमित बाबू परदेशी (रा. पद्मावती, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत एका तरुणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात फिर्याद दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, तरुणी आरोपी सुमित याची प्रेयसी असून त्यांचे नाते तुटले आहे. प्रेयसी इतर व्यक्तीशी बोलत असल्याच्या रागातून सुमित याने बदला घ्यायचा ठरवला. प्रेयसीला धडा शिकविण्यासाठी सुमितने यूट्यूबवर चोरी कशी करावी, याची माहिती घेतली. त्यानंतर मास्क घालून वेशांतर करून घरफोडी केली. रविवारी (ता. ०२) आंबेगाव येथील लक्ष्मी गार्डन सोसायटी भागात घडली चोरी झाल्याची तक्रार तरुणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दिली होती.
सदर घटनेचा पोलीस तपास करीत असताना पोलिसांनी घटनास्थळ आणि आजूबाजूचे सीसीटीव्ही चित्रीकरण तपासल्यानंतर संशयित व्यक्ती दिसून आली. परिसरातील इतर सीसीटीव्हीचे चित्रीकरण तपासल्यानंतर आरोपीची ओळख पटली. त्यानुसार परदेशी याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
सुमित याच्याकडून गुन्ह्यातील २८ तोळे दागिने आणि रोख रक्कम असा १४ लाख ६७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस उपायुक्त सागर पाटील आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अमोल रसाळ, अंमलदार गणेश भोसले, मंगेश पवार, हर्षल शिंदे आणि धनाजी धोत्रे यांच्या पथकाने ही कारवाई केली.