पुणे : राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत घोरपडे यांचा मृतदेह निरा नदीच्या पात्रात सापडल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. यामुळे राज्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.
शशिकांत घोरपडे हे साताऱ्याचे मूळ रहिवासी होते. ते कालपासून बेपत्ता होते. त्यांच्या नातेवाईकांनी ते बेपत्ता असल्याची खबर पोलिसांकडे दिली होती. त्यानंतर पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेज तपासले. त्यात निरा नदीच्या पात्रालगत एका हॉटेलपासून ते नीरा नदीकडे जात असताना दिसले, त्यामुळे अनेकांच्या मनातील पाल चुकचुकली होती. आणि त्यांनी नीरा नदीत उडी मारली असावी. असा कयास बांधला जात होता.
दरम्यान, एनडीआरएफसह महाबळेश्वर ट्रेकर्स, भोईराज स्वयंसेवक, शिरवळ रेस्क्यू आदींचे स्वयंसेवक येथे शोध घेत होते. पथकाला घोरपडे यांचा मृतदेह नीरा नदीच्या पुलाच्या भिंती शेजारी आढळून आला आहे.
राजगड पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक सचिन पाटील, पोलिस नाईक गणेश लडकत, शिरवळच्या फौजदार वृषाली देसाई, सहायक फौजदार अनिल बारेला आदींसह ४० जणांचे पथक यामध्ये कार्यरत होते.