उरुळी कांचन, (पुणे) : दहीटने (ता. दौंड) येथील मुळा मुठा नदी पात्रात उरुळी कांचन (ता. हवेली) येथील मागील आठ दिवसापासून बेपत्ता असलेल्या महिलेचा मृतदेह शनिवारी (ता.१६) आढळून आला आहे.
सुनिता विलास चौधरी (वय- ३४ रा.तुळशीराम नगर, उरुळी कांचन, ता. हवेली) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी महिलेचे वडील अर्जुन धोंडीबा बचुटे (वय-७३, रा. आंनदनगर, भोई डोंगरी, नितोली, ता. कल्याण, जि. ठाणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली होती. दरम्यान, सदर महिलेची आत्महत्या आहे का घातपात हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील तुळशीराम नगर परिसरात सुनिता या नवऱ्यापसून वेगळ्या राहत होत्या. रविवारी (ता. १०) घरातून कोणाला काही न सांगता निघून गेल्या होत्या. कुटुंबीय, नातेवाईक विविध ठिकाणी शोध घेऊनही न सापडल्याने ते बेपत्ता झाल्याची तक्रार वडील अर्जुन बचुटे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिली होती.
दरम्यान, शनिवारी (ता. १६) सुनिता चौधरी यांचा मृतदेह हा दहीटने ग्रामपंचायत हद्दीतील मुळा मुठा नदीच्या पात्रात मिळून आला आहे. तपास यवत पोलीस करीत आहेत.