पुणे : किरकोळ वादातून अल्पवयीन पत्नीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना लोहगाव येथील निंबाळकरनगर परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
संजना उदय मकदूम (वय-१७, रा. टिंगरेनगर, विश्रांतवाडी) असे खून झालेल्या अल्पवयीन युवतीचे नाव आहे.
आरोपी चेतन उर्फ आकाश सोमनाथ मिसाळ (वय २३, रा. लोहगाव) याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी संजनाच्या आईने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
विमानतळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चेतन उर्फ आकाश मिसाळ आणि संजना यांची ओळख होती. आरोपीने संजनाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून १ नोव्हेंबर २०१८ रोजी पळवून नेले होते. याप्रकरणी संजनाच्या पालकांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती.
त्यानंतर पोलिसांनी अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी आरोपी चेतनला अटक केली होती. या गुन्ह्यात न्यायालायाने त्याला नुकताच जामीन मंजूर झाला होता. त्यानंतर चेतनने संजनाला पुन्हा पळवून नेले. आणि तिच्याशी विवाह केला. व दोघे जण लोहगावमधील निंबाळकरनगर परिसरात राहत होते.
दरम्यान, आरोपी चेतनने संजनाचा छळ सुरू केला. दोघांमध्ये किरकोळ कारणावरुन वाद झाला. आरोपीने संजनाला बेदम मारहाण करुन तिचा गळा आवळून खून केला. याप्रकरणी संजनाच्या आईने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपी चेतन उर्फ आकाश मिसाळ याला अटक केली आहे. आरोपी चेतनला न्यायालयात हजार केले असता, न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पुढील तपास विमानतळ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रत्ना सपकाळे करीत आहेत.