पुणे : शिवाजीनगर येथील पाटील इस्टेट पुलाखाली पायी जात असताना एका तरुणाला दोन चोरट्यांनी अडवून गांजा विकतो का?, असे बोलून त्याच्या खिशातील मोबाईल व रोकड चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना शनिवारी (ता. २९ ) रोजी मध्यरात्री घडली आहे. याप्रकरणी खडकी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
राहुल बाबु रिटे (वय २५, रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर ) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे.
याप्रकरणी दिनेश भागवत पवार (वय ३२, रा. केळगाव, आळंदी ) यांनी खडकी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी दिनेश आणि त्यांचा आतेभाऊ हे इस्टेट पुलाखालून पायी जात असताना, तेथे अनोळखी दोघे दुचाकीवर येऊन थांबले. आणि त्यांच्यापैकी एकाने फिर्यादी दिनेशला अडवून तू गांजा विकतो का? असे बोलून त्याचा शर्टच्या खिश्यातून मोबाईल फोन व रोख रक्कम असा २० हजार ३०० रुपयांचा माल जबरदस्ती चोरला आणि दोघेजण दुचाकीवर बसून पसार झाले.
दरम्यान, याप्रकरणी दिनेश पवार यांनी खडकी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी राहुल रिटे याला अटक केली आहे. त्याच्या साथीदाराचा शोध पोलीस घेत आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोपे करीत आहेत.