पुणे प्राईम न्यूज: अंमली पदार्थ तस्कर ललित पाटील पलायन प्रकरणात ससून हॉस्पिटलचे संबंधित जबाबदार वैद्यकीय अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यासाठी खेडमधील विशेष कोर्टात विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी अर्ज केला आहे.
कुप्रसिद्ध अंमली पदार्थ तस्कर ललित अनिल पाटील आणि त्याचा साथीदार यांच्यावर 2020 मध्ये 132 किलो मेफेड्रोन बाळगल्याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. सध्या हा खटला खेडच्या विशेष कोर्टात सुरु आहे. याच खटल्यात आज विशेष अंमली पदार्थ व सत्र न्यायाधीश यांच्या कोर्टात सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील ऍड. शिशिर हिरे यांनी अंमली पदार्थ विरोधी कायदा कलम 25, 29 नुसार अर्ज दाखल केला आहे.
या अर्जात आरोपी ललित पाटील याला ससून हॉस्पिटलच्या अंतर्गत येणाऱ्या रुग्णालय जेल कक्षातून अंमली पदार्थांचा व्यापार करण्याची मुभा दिली. तसेच आरोपीस कोणत्याही सबळ कारणांशिवाय हॉस्पिटलमध्ये आश्रय दिला म्हणून विद्यमान खटल्यात गुन्हेगारी प्रक्रिया संहिता कलम 311 नुसार संबंधित हॉस्पिटलचे अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आणि कारागृहाचे डॉक्टर यांना आरोपी म्हणून जबाबदार धरण्यात यावे, अशी मागणी केली आहे.
याशिवाय संबंधितांकडून फरार आरोपी ललित पाटील यांचे संपूर्ण जेल रेकॉर्ड, हॉस्पिटलमध्ये वेळोवेळी भरती असल्याचे रेकॉर्ड, हालचाल नोंद वही मागविण्याबाबतही स्वतंत्र अर्ज दाखल करून विशेष न्यायाधीश यांच्याकडे हिरे यांनी दोन्ही अर्जावर युक्तिवाद केला. युक्तिवादादरम्यान हिरे यांनी ससून हॉस्पिटलमध्ये चालणारे गैरप्रकार थांबविण्यासाठी कडक भूमिका घेण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. सदर अर्जावर पुढील सुनावणी 9 ऑक्टोबर रोजी होईल.