पुणे : केंद्र सरकारने बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेच्या अटक केलेल्या एका संशयिताने कोंढवा परिसरात चार बेकायदा इमारती बांधून त्यांची विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) तपासात उघडकीस आला आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणेने सप्टेबर महिन्यात दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी महाराष्ट्रासह केरळ, तमिळनाडू, कर्नाटक आदी ११ राज्यांमध्ये ‘पीएफआय’च्या अनेक ठिकाणांवर छापे टाकले होते. ‘एनआयए’ने या राज्यांमधील ‘पीएफआय’च्या राज्य आणि जिल्हा स्तरावरील नेत्यांच्या कार्यालयांची; तसेच घरांची झडती घेतली.
या कारवाईत तपास यंत्रणांनी शंभरपेक्षा अधिक ठिकाणी छापे टाकून तब्बल १०६ जणांच्या ताब्यात घेतले होते. महाराष्ट्रात तसेच पुण्यातही अटकेची कारवाई करण्यात आली होती.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकानेही समांतर तपास केला होता. या तपासात अटकेतील एका संशयिताने कोंढवा परिसरात चार बेकायदा इमारती बांधल्याचे ‘एटीएस’च्या तपासात निष्पन्न झाले. ‘एटीएस’ने या इमारतींमध्ये गुंतविलेल्या पैशांबाबत तपास केला. सकृतदर्शनी तरी त्यामध्ये गैरमार्गाने पैसे गुंतविल्याचे निष्पन्न झालेले नाही.
तरीही या इमारती बेकायदा बांधण्यात आल्याने त्यांची माहिती महापालिकेला देण्यात आली आहे. त्यानुसार महापालिकने या इमारतीत राहणाऱ्यांना नोटिसा बजाविण्यास सुरुवात केली आहे.
‘पीएफआय’शी संबंधित व्यक्तींनी या इमारती बेकायदा बांधल्या असून, त्यांची विक्रीही बेकायदेशीरपणे केली आहे. या ठिकाणी नागरिक राहत असल्याने त्या पाडणे अडचणीचे ठरणार आहे. एकप्रकारे या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांचीही फसवणूक झालेली आहे.
त्यामुळे या नोटिसा बजावल्या गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात गोंधळ उडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेकडूनही पुरेशी काळजी घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
केंद्रीय यंत्रणांनी आतापर्यंत केलेल्या दाव्यानुसार देशामध्ये गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या घातपाती; तसेच समाजकंटकांकडून केल्या जाणाऱ्या आंदोलनांमध्ये सहभागी असलेल्या, पोलिस कारवाईमध्ये पकडलेल्या अनेकांचा संबंध कोणत्या ना कोणत्या प्रकारे ‘पीएफआय’शी आला आहे.
या संघटनेच्या वतीने परदेशातून विशेषतः आखाती देशांतून येणारा पैसा देशविघातक कृत्यांसाठी वापरला जात असल्याचा संशय आहे. पैशांचा स्रोत आणि त्याचा झालेला वापर याबाबत सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) सखोल चौकशी करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर कोंढव्यात उभ्या राहिलेल्या इमारतींबाबतही पुरेशी खबरदारी घेण्यात येत आहे.