शहापूर : पत्नीचा गर्भपात करण्यासाठी सोनोग्राफी सेंटरमध्ये घेऊन गेल्याच्या संशयावरून जावयाने पोलीस पाटील असलेल्या सासऱ्यालावरच लोखंडी रॉडने हल्ला केल्याची धक्कादायक घटना शहापूर येथे घडली आहे. या घटनेमुळे सोनोग्राफी सेंटरमध्ये गोंधळ उडाला होता. याप्रकरणी हल्लेखोर जावयावर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शरद सुदाम निचिते असे गुन्हा दाखल झालेल्या जावयाचे नाव आहे. तर या हल्ल्यात पोलीस पाटील असलेले सासरे शशिकांत एकनाथ दुभेळे (वय-५२) गंभीर जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शशिकांत दुभेळे हे दहिगाव (ता. शहापूर) गावाचे पोलीस पाटील आहेत. दुभेळे यांची कन्या प्रज्ञा हिचा विवाह पाषाणे (ता. शहापूर) येथील शरद निचिते याच्याशी २६ एप्रिल २०२० रोजी झाला होता. पती शरद हा नेहमीच पत्नी प्रज्ञा हिला मारहाण करीत होता. प्रज्ञा गरोदर राहिल्यानंतरदेखील शरद मारहाण करीत होता. या सर्व गोष्टींचा परिणाम प्रज्ञाच्या पोटातील बाळावर होईल, अशी भिती तिचे वडील आणि शरदचे सासरे शशिकांत दुभेळे यांना वाटायची.
शशिकांत दुभेळे यांनी ७ जानेवारीला मुलीसह आरोपी जवाईला घेऊन शहापूर शहरातील एका खाजगी रुग्णालयात तपासणीसाठी गेले होते. त्यातच आरोपी पतीला सासरे आपल्या पत्नीचा गर्भपात करत असल्याचा संशय आला. त्यामुळे रागाच्या भरात आरोपी शरदने सासऱ्यांना जीवे मारण्याची धमकी नातेवाईकांसमोरच दिली होती. मात्र त्यावेळी नातेवाईकांनी मध्यस्थी करुन दोघांचे वाद सोडवले होते.
दरम्यान, शशिकांत दुभेळे हे प्रज्ञाला पुन्हा सोनोग्राफी करण्यासाठी शहापूर शहरातील पंडित नाक्यावर असलेल्या आस्था सोनोग्राफी सेंटरमध्ये ९ जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास गेले होते. दुसरीकडे आरोपी जावयाला पत्नीचा गर्भपात करण्यासाठीच सासऱ्यांनी तिला सोनोग्राफी करण्यासाठी नेल्याचा पुन्हा संशय आला.
त्यानंतर आरोपी शरद निचिते हा थेट सोनोग्राफी सेंटरमध्ये पोहोचला. त्यानंतर त्याने सासऱ्यांशी वाद घालत माझ्या पत्नीला गर्भपात करण्यासाठी घेऊन आला का? असा सवालही केला. या गैरसमजातून शरदने सासरे शशिकांत दुभेळे यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. जीव वाचविण्यासाठी शशिकांत यांनी डॉक्टरांच्या केबिनमध्ये धाव घेतली. आणि जावयाच्या हल्ल्यापासून शशिकांत यांनी सुटका करून घेतली.