मुंबई : चीन, हाँगकाँग आणि पाकिस्तानमध्ये ट्रेनिंग घेऊन आलेला संशयित दहशतवादी सरफराज मेमन हा मुंबईत पोहचला असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. त्यामुळे पुन्हा मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचे सावट असल्याचं समोर येत आहे. तर या संशयित व्यक्तीचा शोध सध्या सर्वत्र सुरू असून सुरक्षा यंत्रणा अलर्टमोडवर आहे.
राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेकडून मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला सावध राहण्याबाबतचा ईमेल पाठविला आहे. सरफराज हा मध्यप्रदेशच्या इंदोरचा आहे. हा व्यक्ती भारतासाठी धोकादायक असून त्याची ओळख पटावी यासाठी त्याचे ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट व आधारकार्डची कॉपीही मेल द्वारे पाठवलेली आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, मुंबई पोलिसांनी संशयित व्यक्तीचा शोध सुरु केला असून सर्व सुरक्षा यंत्रणा अलर्टमोडवर झाली आहे.