अजित जगताप
सातारा : सातारा शहरात स्वच्छता ठेका बेकायदेशीरपणे देऊन सातारा नगरपालिकालूट करीत असून याविरोधात निविदा रद्द आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते श्री सुशांत मोरे यांनी केली आहे.
सातारा नगरपालिका २०२१-२२ या वर्षाकरिता कचरा संकलनाची निविदा बेकायदेशीरपणे आणि अधिकाऱ्यांनी संगनमत करुन पुणे येथील भगवती स्वयंरोजगार सेवा संस्थेला दिल्याबद्दल येथील सातारा जिल्हा न्यायालयात दावा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात सातारा पालिकेचे मुख्याधिकारी, आरोग्य निरीक्षक सागर बडेकर, प्रशांत गंजीवाले, विभाग प्रमुख प्रकाश राठोड, पुणे येथील भगवती स्वंयरोजगार सेवा संस्था यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. यामध्ये दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई आणि निविदा रद्द करण्याची मागणी केल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली. सातारा जिल्हा न्यायालयात या दाव्याची सुनावणी दि ५ डिसेंबर रोजी होणार आहे.
सातारा नगरपालिका आरोग्य विभागामार्फत २०२१-२२ या वर्षाकरिता सातारा नगरपरिषद हद्दीतील प्रभाग १ ते २० मधील घंटागाडी व ट्रॅक्टर ट्रॉलीमार्फत घरोघरी जावून कचरा संकलन करुन, सोनगाव कचरा डेपो येथे पोचवणे या कामाची वार्षिक फेर ई-निविदा दि २२ एप्रिल २०२२ रोजी प्रसिध्द करण्यात आली होती.
या फेर ई-निविदेमध्ये दि २ मे २०२२ रोजीपर्यंत एकूण सहा संस्थांनी सहभाग नोंदविला होता. या प्राप्त निविदेमधील पाकीट क्रं.१ उघडले असता त्यामधील प्राप्त निवेदनामधील समीक्षा वेस्ट मॅनेजमेंट इन्फ्रा प्रा. लि. ठाणे या पात्र झालेल्या होत्या आहेत.
त्याप्रमाणे नगरपालिका अधिका-यांनी टिप्पणी करुन त्यावर दि ९ जून २०२२ रोजी सह्या केलेल्या आहेत व त्याच टिप्पणीमध्ये आवश्यक कागदपत्रांची छाननी करण्यासाठी समिक्षा वेस्ट मॅनेजमेंट इन्फ्रा प्रा. लि. ठाणे यांना ई-मेल व्दारे २४ तासाच्या आतमध्ये मूळ कागदपत्रासह हजर राहण्यास कळवले होते, परंतु त्यांनी २४ तासाच्या आत मूळ कागदपत्रे जमा केलेली नाही असा उल्लेख केलेला आहे ते पूर्णपणे बेकायदेशीर आहे.
केवळ या संस्थेला फेर ई-निविदा प्रक्रियेतून बाहेर घालवण्यासाठी बेकायेदशीर प्रक्रियाा केलेली आहे, कारण ई निविदा प्रक्रियेतील पाकिट क्रं.१ उघडले असता त्यामधील सर्व कागदपत्रांची पडताळणी केल्याशिवाय पुढील प्रकियेसाठी म्हणजे पाकिट क्रं.२ उघडण्याकरिता संस्था पात्र होत नाहीत, म्हणूनच ठाणे येथील संस्थेनी संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता केल्यामुळेच दि २ जून २२ रोजी तीन पात्र संस्थांची पाकिट क्रं.२ उघडले असता समीक्षा वेस्ट मॅनेजमेंट कन्स्ट्रक्शन कंपनी ठाणे यांची ३ कोटी २९ लाख १९ हजार १, भगवती स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था पुणे यांची ३ कोटी ३० लाख ४४ हजार २९१ रुपये, स्वां. वि. दा. सावरकर स्वयंरोजगार सेवा संस्था, सातारा यांची ३ कोटी ४० लाख ६४ हजार ७६८ या दराच्या निविदा आलेल्या होत्या.
या दरातील सर्वात कमी रक्कमेची निविदा ठाणे येथील संस्थेची असताना आणि सर्व कागदपत्रांची पूर्तता झालेली असताना केवळ पुणे येथील भगवती संस्थेशी हातमिळवणी करुन मुख्याधिकारी, आरोग्य निरीक्षक सागर बडेकर, आरोग्य निरीक्षक प्रशांत गंजीवाले, विभाग प्रमुख प्रकाश राठोड यांनी पुणे संस्थेला निविदा मंजूर करुन नगरपालिकेचे आणि शासकीय अनुदानाचे नुकसान केले आहे.
तसेच पुणे भगवती संस्थेचे कार्यक्षेत्र हे पिंपरी काळेवाडी पर्यंतच मर्यादित आहे. त्याचप्रमाणे साताऱ्यातील स्थानिक संस्थेला सुध्दा या प्रक्रियेत डावलण्यात आले आहे. त्यामुळे ही फेर ई-निविदा बेकायदेशीर केलेली आहे.
याकामी दि ८ ऑगस्ट २०२२ रोजी मुख्याधिकाऱ्याकडे तक्रार अर्ज केला असता त्यांनी कोणतेही समर्पक, योग्य, कायदेशीर उत्तर दिलेले नाही. प्रतिवादींनी नियमांचे पालन न करता फेर ई निविदा प्रक्रिया मनमानी पध्दतीने, बेकायेदशीर रितीने, केवळ पुणे येथील संस्थेला निविदा देण्याकरिता पूर्व नियोजित भ्रष्टपणे, आर्थिक तडजोडीने केलेली होती व आहे.
यामुळे सार्वजनिक आणि शासकीय अनुदानाचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे फेर ई-निविदा प्रक्रिया रद्द करणे तसेच या दाव्याचा अंतिम निकाल होईपर्यंत फेर ई निविदा प्रक्रियेच्या अनुषंगाने पुणे येथील भगवती संस्थेस कोणत्याही प्रकारचे अनुदान देण्यात येऊ नये अशी तूर्तास ताकीद द्यावी, या प्रक्रियेचे वरिष्ठ पातळीवरील ऑ़डिट करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी दाव्यात करण्यात आल्याचेही मोरे यांनी पत्रकात नमूद करण्यात आले.
श्री. मोरे यांच्यातर्फे अॅड. रुपनवर या दाव्याचे काम पाहत आहेत.
विभाग प्रमुख प्रकाश राठोड यांची तातडीने बदली करावी
सातारा पालिकेतील आरोग्य विभाग प्रमुख प्रकाश राठोड यांच्या मनमानी, नियोजनशून्य कारभारामुळे सातारा पालिकेची बदनामी होत असून सातारकरांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
त्यांच्या विशिष्ट संस्थेलाचा बेकायदेशीरपणे निविदा देण्याच्या प्रक्रियेतून भ्रष्ट कारभार उघड झाला असून आर्थिक तडजोड केल्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे त्यांची तातडीने बदली करण्यात यावी अशी मागणीही सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी केली आहे.