लोणी काळभोर : गेल्या ८ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील इंदिरानगर परिसरात शनिवारी (ता.१८) रात्री उघडकीस आली आहे. वाघोली अग्निशामक दलाच्या जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करुन झाडावरील २५ फुट उंचीवरील तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यास यश आले आहे.
सोमनाथ दिलीप मोरे (वय-२७ रा. इंदिरानगर, लोणी काळभोर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार, सोमनाथ मोरे ही गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता होता. याप्रकरणी त्यांच्या नातेवाईकांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलीस आणि त्याचे नातेवाईक त्याचा शोध घेत होते.
त्यानंतर, शनिवारी काही नागरिकांना एका तरुणाने झाडाला गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. नागरिकांनी तातडीने हि माहिती लोणी काळभोर पोलिसांना दिली. पोलिसांनी तत्काळ वाघोली दलाली दिली. त्यानंतर वाघोली अग्निशमन दलाचे केंद्र अधिकारी विजय महाजन व त्यांचे सहकारी संदीप शेळके, नितीन माने, मयूर गोसावी, अभिजित दरोड, चेतन खमसे शनिवारी सायंकाळी सातच्या घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान, सोमनाथ मोरे याने ज्या ठिकाणी आत्महत्या केली होती. ते ठिकाणी मुख्य रस्त्यापासून बरेच आत होते. त्यातच पावसामुळे सर्वत्र चिखल आणि ओढ्याला पाणी आल्याने जवानांना घटनास्थळी पोहचण्यास अडचणी येत होत्या. मात्र जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत घटनास्थळी जाऊन २५ फुटावरुन मृतदेह खाली उतरवला. आणि मृतदेह लोणी काळभोर पोलिसांच्या ताब्यात दिला.