(Suicide News )पुणे : पुणे जिल्ह्यातील भोर येथून धक्कादायक बातमी समोर आली आहे. तीन महिन्यापुर्वी लग्न झालेल्या एका नव दाम्पत्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार भोर तालुक्यातील केळवडे गावात घडला आहे. 8 दिवसांपूर्वी माहेरी गेलेल्या पत्नीने आत्महत्या केल्यानंतर दुसऱ्याच, दिवशी पतीनेही राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
समृद्धी धीरज कोंडे (वय 22) असे आत्महत्या केलेल्या पत्नीचे नाव आहे तर धीरज संभाजी कोंडे पतीचे नाव आहे. या घटनेची राजगड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार…!
समृद्धी हिने माहेरी गेली असताना पिरंगुट ता. मुळशी येथे मावशीच्या घरी जाऊन दि 28 मार्च रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. तिचा अंत्यविधी ता. 29 रोजी केळवडे येथे पार पडला. त्यानंतर तिचा पती धीरज प्रचंड नैराश्यात होता यातूनच त्याने (ता. 30) रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घरातील पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना लक्षात येताच त्याच्या कुटुंबीयांनी त्यास सोडवुन तातडीने नसरापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी आणले परंतु उपचारा पुर्वीच त्याचा मृत्यु झाला होता.
धीरज आणि समृध्दी यांचा अवघ्या तीनच महिन्यापुर्वी विवाह झाला होता. समृध्दीच्या आत्महत्येचे कारण समजु शकले नाही. तीच्या मृत्युची पिरंगुट पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. तीच्या मृत्यूच्या नैराश्यातुन धीरजने आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.