पुणे : ग्रामीण पाणी पुरवठा योजनेच्या पाईप खरेदीचे बिल मंजूर केल्याच्या मोबदल्यात ७० हजार रुपये लाच स्वीकारताना ग्रामीण पाणी पुरवठा उप विभाग भोर/वेल्हा येथील उपअभियंत्याला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. पुणे एसीबीने ही कारवाई मंगळवारी (ता.७) रोजी केली आहे.
जयंत सोपान ताकवले असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या उप अभियंत्याचे नाव आहे. याप्रकणी ३४ वर्षाच्या व्यक्तीने पुणे एसीबीकडे तक्रार केली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, तक्रारदार यांनी ग्रामीण पाणी पुरवठा योजनचे पाईप खरेदी केले होते. याचे बिल मंजूर केल्याचा मोबदला म्हणून जयंत ताकवले यांनी तक्रारदार यांच्याकडे २ टक्के प्रमाणे ७० हजार रुपये लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी पुणे एसीबीकडे तक्रार केली. पुणे युनिटने पडताळणी केली असता जयंत ताकवले यांनी ७० हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार मंगळवारी (ता. ७) सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून लाचेची ७० हजार रुपये रक्कम स्वीकारताना ताकवले यांना रंगेहाथ पकडण्यात आले. जयंत ताकवले यांच्यावर भोर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पुणे एसीबीचे पोलीस निरीक्षक भारत साळुंखे करीत आहेत.
ही कामगिरी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे,अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.