पुणे : जुन्या वादातून दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने नववीतील एका मुलावर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील भैरवनाथ विद्यालयाच्या आवारात घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
कुणाल विकास कराळे (वय- १५) असे घटनेत जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव असून तो नववीमध्ये शिकतो. या मुलाच्या डोक्याला व हाताला गंभीर जखम झाली असून त्याच्यावर मंचर येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुणाल कराळे व इयत्ता दहावीत शिकणाऱ्या मुलांमध्ये एक महिन्यापूर्वी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्यावेळी शाळेतील शिक्षकांनी तो वाद मिटविला होता. मात्र, दहावीतील मुलाने खुन्नस डोक्यात ठेवून बुधवारी शाळेत कोयता लपवून आणला होता.
कुणाल हा पुढे जात असताना शाळेच्या मैदानात असताना त्याने पाठीमागून कोयत्याने तीन ते चार वार केले. यात कुणालच्या हाताच्या बोटांना व डोक्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. याबाबत शाळेतील शिक्षकांनी पोलिसांना माहिती दिली. जखमी कुणालला ताबडतोब मंचर येथील उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी दाखल केले आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मंचर पोलिसांना मिळताच त्यांनी रुग्णालयात जाऊन विद्यार्थ्यांकडून घडलेल्या घटनेची माहिती घेतली. घटनेची चौकशी केली असून आरोपीवर गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरा पर्यंत सुरू होते.