नाशिक : नाशिकमध्ये एका शाळेत दहावीची परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या बॅगत चक्क कोयता सापडला आहे. या घटनेने शाळा प्रशासन हादरून गेलं आहे. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. नाशिकमधील औद्योगिक वसाहतीत असलेल्या हिंदी भाषिक शाळेत हा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने नाशिक शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमक काय घडल?
नाशिकमधील सातपुरच्या हिंदी भाषिक शाळेत दहावीची परीक्षा सुरु होती. या शाळेत नेहमी प्रमाणे सर्व विद्यार्थी परिक्षा देण्यासाठी आले होते. परीक्षा सुरू होण्यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्या बॅग परीक्षा हॉलच्या बाहेर ठेवल्या. या परीक्षा केंद्रावर सुरक्षा रक्षक म्हणून एका होमगार्डची नेमणूक होती. या होमगार्डला परीक्षा हॉल बाहेर ठेवलेल्या बॅगेत काहीतरी असल्याचा संशय आला. त्यामुळे त्याने ती बॅग चेक केली असता त्यात कोयता आढळून आला.
या घटनेची माहिती सातपूर पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. परीक्षा संपल्यानंतर संशयास्पद बॅग उचलणाऱ्या विद्यार्थ्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तर दिले. नेमका बागेत कोयता कशासाठी आणला याचे कारण अद्याप समजू शकले नसून या प्रकरणाची पोलीस कसून चौकशी करत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माच्छरे यांनी दिली आहे.