युनूस तांबोळी
शिरूर : शिरूर तालुक्याच्या बेट भागात महावितरण कंपनी वीज चोरून वापरणाऱ्या शेतकऱ्यांवर धडक कारवाई करण्यात आली.
बारामती परिमंडळ अभियंता सुनील पावडे व कार्यकारी अभियंता केडगाव विभाग राजेंद्र एडके यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण ११३ वीज ग्राहकांवर ही कारवाई करण्यात आली.
शाखा कार्यालय टाकळी हाजी उपविभाग शिरूर यांनी कवठे यमाई, जांबुत व वडनेर या गावातील अनधिकृत वीज वापर करणाऱ्या कृषी ग्राहकांवर धडक कारवाई करण्यात आली. या मोहिमेमध्ये उपकार्यकारी अभियंता सोमनाथ माने, शाखाधिकारी राजेंद्र इंगळे, बाळासाहेब टेंगले, पी. ए. मुंगसे, डी. एस. खाकरे व टाकळी हाजी न्हावरा शाखेतील तांत्रिक कर्मचारी उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी वीज चोरी न करता आमच्याकडे अर्ज भरून विजेची मागणी केल्यास आम्ही त्यांना तत्काळ वीज कनेक्शन उपलब्ध करून देऊ, असे उपकार्यकारी अभियंता सोमनाथ माने यांनी यावेळी सांगितले.
अनेक शेतकरी वर्षानुवर्षे वीज चोरून वापरत असून त्यांच्यावर धडक कारवाई केली जाईल तसेच गुन्हा दाखल करण्यात येईल. शेती पंपाचे चालू वीज बिल भरून विद्युत वितरण कंपनीला सहकार्य करावे असे आवाहन सोमनाथ माने यांनी यावेळी केले.
बेट भागात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात वीज चोरी करणाऱ्या शेतकरी वर्गावर विद्युत मंडळाने धडक कारवाई केल्यामुळे वीज चोरून वापरणाऱ्या शेतकऱ्यांची चिंता वाढली असून त्यांच्यावर वीज बिलाची वसुली तसेच गुन्हेही दाखल करण्यात येणार असल्याच्या हालचाली मंडळाने सुरू केले आहेत .