लोणी काळभोर (पुणे) : पुणे – सोलापूर महामार्गावर लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील शिवशक्ती समोर मंगळवारी (ता. ३०) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात जीवितहानी झाली नसली तरी गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मागील आठ दिवसात शिवशक्ती येथे हा चौथा अपघात झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे सोलापूर महामार्गावरून लोणी काळभोर येथील इंडियन ऑइल कंपनीतील अधिकारी रोहन गुप्ता हे सुट्टी झाल्यानंतर त्यांच्या जवळ असलेल्या चारचाकी बलेनो गाडीने घरी जात असताना ५ वाजण्याच्या सुमारास शिवशक्ती येथे आले असता, पाठीमागून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या एका कंटेनरने जोरदार धडक दिली.
त्यानंतर रोहन गुप्ता यांच्या बलेनो गाडीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने, त्यांच्या बलेनो गाडीने पुढे असलेल्या रमेश पाटील यांच्या स्विफ्ट चारचाकी गाडीला जोरदार धडक दिली. या विचित्र अपघातात दोन्ही चारचाकी गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार घनश्याम आडके, ईश्वर भगत तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कंटेनर चालक सोमनाथ तुकाराम साबळे याला ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.