बेळगाव : बेळगावपासून साधारण २५ किमी लांब असणाऱ्या हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या पाच ते सात ट्रकवर दगडफेक करत तोडफोड करण्यात आली आहे.
यामुळे टोलनाक्यावर वातावरण चिघळलं असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या प्रकारामुळे सध्या सुरु असलेला महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद अजून चिघळण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या वृत्तानुसार, कन्नड रक्षण वेदिकेचे नेते नारायण गौडा आज (मंगळवार) बेळगावच्या दौऱ्यावर आहेत. पोलिसांनी त्यांना बेळगाव दौरा करण्यास मनाई केली होती. तरीही ते बेळगावच्या दिशेने आले. त्यामुळे हिरेबागवाडी येथील टोलनाक्यावर पोलिसांनी त्यांना रोखलं.
यावेळी आक्रमक झालेल्या कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्लाबोल केला. महाराष्ट्रातील पाच-ते सहा वाहनांवर दगडफेक केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. यातील काही वाहनं पुण्यातील आहेत.
सीमाप्रश्नावर कन्नड रक्षण वेदिका संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी गाड्यांवर चढून घोषणाबाजी देखील केली. तसेच काही कार्यकर्ते गाड्यांसमोर व गाडीखाली झोपून महाराष्ट्राच्या गाड्या पुढे जाऊ देणार नसल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
त्याबरोबरीने महाराष्ट्राच्या वाहनांवर असणाऱ्या नंबरप्लेटवर चपला मारल्या आहेत. महाराष्ट्रतील मंत्री आज बेळगावला जाणार होते. मात्र आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आजचा मंत्र्यांनी दौरा टाळला होता.