पुणे : मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील खलघाट येथे महाराष्ट्र राज्याच्या एस टी महामंडळाची एक प्रवासी बस आज सकाळी पावणे अकराला नर्मदा नदीत पडल्याने 13 प्रवाशांचा मृत्यू झाला. बस इंदूरहून महाराष्ट्राकडे जात होती. मोटारसायकलला वाचवताना हा अपघात झाला. दरम्यान अपघातात मृत पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे प्रत्येकी दहा लाख रुपये मदत देण्याची कार्यवाही लगेच करावी असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी एस टी महामंडळाला दिले आहेत.
दरम्यान जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने या अपघातासंदर्भात एक नियंत्रण कक्ष स्थापन केल्याची माहिती देखील जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली आहे. या नियंत्रण कक्षाचा क्रमांक ०२५७२२२३१८० आणि ०२५७२२१७१९३ असा आहे.
असा झाला अपघात:
मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील खलघाट येथे महाराष्ट्र राज्य परिवहन बस नर्मदा नदीत पडल्याने 13 प्रवाशांचा मृत्यू झाला. सकाळी 10.45 वाजता हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व 13 जणांचे मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आले आहेत. या अपघातात एकही प्रवासी वाचला नाही, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. क्रेनच्या सहाय्याने बस बाहेर काढण्यात आली आहे.
बाजूकडून येणाऱ्या मोटारसायकलस्वाराला वाचवताना हा अपघात झाला. पुलाचे रेलिंग तोडून बस थेट 25 फूट खाली नदीत पडली. खोलघाटच्या जुन्या पुलावर हा अपघात झाला.
आणि तो ठरला बसचा शेवटचा प्रवास :
मिळालेल्या माहितीनुसार, इंदूरहून महाराष्ट्राकडे जाणारी प्रवासी बस खलघाट संजय सेतू पुलावर संतुलन बिघडल्याने २५ फूट खाली नदीत पडली. घटनास्थळी धामनोद पोलीस व खलटाका पोलिसांनी जलद बचाव कार्य हाती घेतले. पणबुड्यांच्या मदतीने सर्व प्रवाशांना नदीतून बाहेर काढण्यात आले मात्र एकाही प्रवाशाला जिवंत वाचवता आले नाही.
मदतकार्यासाठी एनडीआरएफची टीमही घटनास्थळी हजर आहे. इंदूरचे आयुक्त पवन कुमार शर्मा यांनी धार आणि खरगोनच्या जिल्हाधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचण्याच्या सूचना दिल्याने प्रशासनाने घटनास्थळी पुढाकार घेतला आहे.
मुख्यमंत्री शिवराज सिंह यांचे निर्देश :
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी खलघाट येथील बस अपघाताची दखल घेत प्रशासनाला तातडीने मदत आणि बचाव कार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. क्रेनच्या साहाय्याने बस बाहेर काढण्यात आली, जलद बचाव मोहीम राबवत सर्व प्रवाशांचे मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आले.
जिल्हा प्रशासन घटनास्थळी आहे. मुख्यमंत्र्यांनी एसडीआरएफ पाठवण्याच्या सूचना दिल्या आहेत, त्याशिवाय घटनास्थळी आवश्यक साधनसामग्री पाठवून जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुख्यमंत्री खरगोन, इंदूर जिल्हा प्रशासनाच्या सतत संपर्कात आहेत.
इंदूरला महाराष्ट्राशी जोडणाऱ्या पुलावर अपघात :
आग्रा-मुंबई (एबी रोड) महामार्गावर हा अपघात झाला. हा रस्ता इंदूरला महाराष्ट्राला जोडतो. घटनास्थळ इंदूरपासून ८० किलोमीटर अंतरावर आहे. संजय सेतू पूल ज्यावरून बस पडली तो धार आणि खरगोन या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर बांधलेला आहे. त्यातील अर्धा भाग खलघाट (धार) आणि अर्धा खलटाका (खरगोन) मध्ये आहे. खरगोनचे जिल्हाधिकारी आणि एसपीही घटनास्थळी पोहोचले आहेत.
महाराष्ट्र परिवहन बस :
नदीत पडणारी बस महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची असून खलघाटात अपघात होण्यापूर्वी बसने 10 मिनिटांचा ब्रेक घेतला , त्यानंतर बस खलघाटातून निघून सकाळी 10:45 वाजता नर्मदेत पडली. समोरून चुकीच्या बाजूने येणाऱ्या मोटारसायकलस्वाराला वाचवताना हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात बस चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस पुलाचे रेलिंग तोडून नदीत पडली. बसमध्ये सुमारे 13 प्रवासी होते.
आम्ही पीडितेच्या कुटुंबासोबत उभे आहोत:
धार बस अपघाताबाबत मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, अपघातानंतर 13 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चर्चा झाली आहे. सापडलेल्या मृतदेहांपैकी ५ जणांची ओळख पटली आहे. त्यांना आदरपूर्वक त्यांच्या गंतव्यस्थानी घेऊन जाईल. प्रभारी मंत्री कमल पटेल यांना अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून, ते परिस्थितीचा आढावा घेत आहेत. या संकटकाळात आम्ही शोकाकुल कुटुंबासोबत उभे आहोत आणि शक्य ते सर्व प्रयत्न करू.
मुख्य मंत्री शिंदे यांचे प्रयत्न :
मध्य प्रदेशात नर्मदा नदीमध्ये आज सकाळी एसटी महामंडळाची बस कोसळून झालेल्या अपघाताबद्धल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून असून बचाव कार्य व्यवस्थित पार पाडावे व जखमींवर लगेच उपचारासाठी मध्य प्रदेश मधील जिल्हा प्रशासनाशी योग्य समन्वय ठेवावा असे निर्देश जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनसंदर्भात मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव तसेच एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांना देखील सूचना केल्या असून बचावलेल्या प्रवाशांना तातडीने आवश्यक ती सर्व मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. मृतदेह बाहेर काढून योग्य प्रक्रियेनंतर त्यांच्या नातेवाईकांना ताब्यात देण्यासंदर्भातही मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या. मुख्यमंत्री स्वतः मदत कार्यावर लक्ष ठेऊन आहेत.