पुणे : राज्य उत्पादन शुल्काने ७ ते ९ जानेवारी या कालावधीत विशेष मोहीम राबवून अवैध मद्य विक्री व अवैध मद्य सेवन करणाऱ्या विरुध्द कारवाई केली आहे. अवैध मद्य विक्री करणाऱ्या ८ गुन्ह्यांमध्ये २५ आरोपींना न्यायालयाने ३७ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तर एमआरपी उल्लंघन केल्याबद्दल वाईन शॉपी व देशी दारू बार यांच्यावर १० विभागीय गुन्हे दाखल केले आहेत.
पुणे जिल्हयात महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ६८ व ८४ नुसार अवैध मद्य विक्री करणाऱ्यांविरुध्द तसेच अवैध ठिकाणी मद्य सेवन करणाऱ्या ग्राहकांविरुध्द कारवाई करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्काने दिले होते. त्याअनुषंगाने पथकाने छापे टाकून एकुण ८ गुन्हे नोंदविले आहेत.
असून त्यामधील अटक करण्यात आलेल्या २९ आरोपींना मा. न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर एकुण २५ आरोपींना दोषी आढळून आले. न्यायालयाने सर्व २५ आरोपींकडुन मिळुन एकुण ३७ हजार रुपयांचा दंड ठोठावीला आहे.
काही वाईन शॉप व देशी दारु बार याचे अनुज्ञप्तीधारक हे जास्तीचा नफा मिळविण्याच्या दृष्टीकोनातून किरकोळ विक्रीच्या कमाल किंमती पेक्षा अधिक दराने मद्य विक्री करित असताना आढळून आले. आशा वाईन शॉपी व देशी दारू बार दुकानांवर एकुण १० विभागीय गुन्हे नोंदविले असुन जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे पुढील कार्यवाही साठी प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.
दरम्यान, या कारवाईमुळे केवळ अवैध मद्य विक्री करणाऱ्या विरुध्दच कारवाई न करता त्यासोबत सदर ठिकाणी मद्यसेवन करणान्यां विरुध्द सुध्दा कारवाई करण्यात आली असल्यामुळे सदर अवैध ठिकाणी मद्यसेवन करणाऱ्या ग्राहकांना सुध्दा चाप बसणार आहे.
अवैध मद्य निर्मिती वाहतुक व विक्री याचे समुळ उच्चाटण करण्याकरिता व गुन्हे गारांना वचक बसण्याकरिता अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, पुणे या विभागाकडुन चालु वर्षामध्ये एकुण ३८२ सराईत आरोपी कडुन चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र घेण्याकरिता सक्षम प्राधिकारी यांना प्रस्ताव सादर केलेले आहे. तसेच एमपीडीए अंतर्गत कारवाईसाठी एकुण १७ प्रस्ताव व मोक्का अंतर्गत २ प्रस्ताव संबंधित सक्षम प्राधिकारी यांना सादर केलेले आहेत.
सदर कार्यवाही राज्य उत्पादन शुल्काचे मुंबई आयुक्त विजय सुर्यवंशी , पुणे विभागीय उपायुक्त अनिल चासकर , पुणे राज्य उत्पादन शुल्काचे अधीक्षक सी. बी.राजपूत यांच्या निर्देशानुसार व उपअधीक्षक एस आर पाटील व युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यकारी तसेच भरारी पथक अधिकारी पुणे यांनी केली आहे.
दरम्यान, या पुढे सुध्दा अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्री विरुध्द नियमित कारवाई सुरु राहणार असुन पुणे जिल्हयामध्ये कोणत्याही नागरीकास अवैध मद्य निर्मिती, वाहतुक व विक्री याबाबत माहिती मिळाल्यास त्यांनी टोल फ्री क्र.१८००२३३९९९९ व दुरध्वनी क्र. ०२०-२६०५८६३३ या क्रमांकावर संपर्क साधुन माहिती देण्यात यावी असे आवाहन मा. अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, पुणे सी. बी राजपुत यांनी नागरिकांना केलेले आहे.