Solapur News : सोलापूर : सांगोला तालुक्यातील आदमापूर येथील मंदिरातून बाळूमामांचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातला. भाविकांची दुचाकी दुभाजकावर आदळून दोन जण जागीच ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. दुचाकीने ट्रिपलसीट जात असताना मिरज-सांगोला महामार्गावर रविवारी सायंकाळी ५:१५ च्या सुमारास काळूबाळूवाडी पुलावर हा अपघात झाला.
मिरज-सांगोला महामार्गावर झाला अपघात
विशाल लक्ष्मण कटाप (वय २६, रा. स्वामी विवेकानंदनगर, हत्तुरे वस्ती, सोलापूर) आणि बसवराज धानाप्पा गौडरू (वय २९, रा. नई जिंदगी, सिद्धेश्वरनगर, सोलापूर) अशी अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. (Solapur News) शांतेश्वर शिरोळे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी दीपक सूर्यकांत शिरोळे (रा. हत्तुरे वस्ती) यांनी पोलीसात फिर्याद दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विशाल ,बसवराज व शांतेश्वरहे तिघेजण बाळूमामांचे दर्शन घेऊनदुचाकीवर ट्रिपल सीट बसून सोलापूरकडे परत येत होते. यांच्यासोबत आणि दोन मित्र त्यांच्या दुचाकीवर होते. (Solapur News) अमावास्येनिमित्त श्रीक्षेत्र आदमापूर येथील बाळूमामाचे दर्शन यांनी घेतले. रविवारी देवदर्शन आटोपून दुपारी १२ च्या सुमारास पाचही जण मिळून परत त्याच दोन दुचाकींवरून सोलापूरकडे परतत होते. यावेळी विशाल, बसवराज, शांतेश्वर हे तिघेजण एका दुचाकीवर बसले होते. ते ट्रिपलसीट मिरजमार्गे सांगोल्याच्या दिशेने निघाले होते. रविवारी सायं ५.१५ च्या सुमारास त्यांची दुचाकी जुनोनी जवळ काळूबाळूवाडी पुलाच्या दुभाजकाला वेगात आदळली. हा अपघात एवढा भीषण होता की, यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.