राहुलकुमार अवचट
यवत : पुणे- सोलापूर महामार्गावरील यवत (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीतील आनंद हॉस्पिटलजवळ असलेल्या सिद्धिविनायक ऑटोमोबाईल दुकानाला भीषण आग लागल्याची घटना सोमवारी (ता. २९) मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या आगीत सुमारे एक कोटींपेक्षा जास्त नुकसान झाले असून अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नाने दोन तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवले.
मिळालेल्या माहितीनुसार, महेश दोरगे यांच्या मालकीच्या सिद्धिविनायक ऑटोमोबाईल दुकानाला सोमवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास भीषण आग लागली. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
या घटनेची माहिती मिळताच दौंड नगरपालिका व कुरंकुभ औद्योगिक क्षेत्त येथील अग्निशमन दल दाखल झाले अग्निशमन दलाच्या जवानांच्या अथक प्रयत्नाने दोन तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात अनेक टायर, ऑइल असल्याने आग भडकली यावेळी दुकानातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले.
यवत परिसरात अग्निशमन दल नसल्याने अनेक वेळा अशा समस्या निर्माण होत असल्याचे नागरिकांमध्ये चर्चा होती. यापुर्वी देखील हॉटेल कांचन, एका फर्निचर दुकानाला व तेलाच्या गोडावूनला आग लागल्याच्या घटना परिसरात घडल्या आहेत.
दरम्यान, यवत, भांडगाव, सहजपुर परिसरातील वाढते औद्योगिकीकरण पाहता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून यापरिसरात अग्निशमन दल ही काळाची गरज असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. शेतकरी कुटुंबातील युवकाने अतिशय मेहनतीने उभा केलेला व्यवसायाची क्षणात भस्मसात झाल्याने नागरिक हळहळ व्यक्त केली जात आहे.
अग्निशामक दल येण्यापुर्वी राहुल बनसोडे यांनी आपल्या पाण्याच्या टँकरने आग विझवण्याचा प्रयत्न केला. यावेळी घटनास्थळी यवत पोलीस ठाण्याचे कर्मचारी, सरपंच समीर दोरगे, ग्रामपंचायत सदस्य सदानंद दोरगे यांसह तरुणांनी आग विझवण्याचे प्रयत्न केले.