नवी दिल्ली : दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडाने संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली आहे. आज (ता. २१) या झालेल्या हत्याकांडाबाबत मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. कारण, आरोपी आफताब पूनावला याची दिल्ली पोलीस आज नार्को टेस्ट करणार आहे. आरोपी आफताबने आपली प्रेयसी श्रद्धाची हत्या करून तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करून जंगलात फेकले. या हत्याकांडाने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे.
तसेच, पोलीस आरोपी आफताबची चौकशी जोरदार करत आहेत. दिल्लीतील कोर्टाने आरोपी आफताब पूनावाला याची नार्को टेस्ट करण्याची परवानगी दिली आहे. नार्को टेस्टच्या माध्यमातून पोलिसांना आफताबकडून काही प्रश्नांची उत्तरे हवी आहेत. नार्को टेस्टमध्ये आफताब अमीन पूनावाला याला ५० हून अधिक प्रश्न विचारले जाऊ शकतात. श्रद्धाची हत्या का केली?, कशी केली?, शस्त्र आणि अन्य पुरावे कुठे आहेत? या हत्येत आणखी कोण सहभागी आहे का?, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या माध्यमातून मिळण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान, आरोपी आफताब पुनावाला याने श्रद्धा वालकर हिची आपणच हत्या केल्याची कबूली यापूर्वीच पोलिसांना दिली आहे. मात्र, त्याने श्रद्धाच्या शरीराचे तुकडे जंगलात कुठे फेकले? याबाबत अद्यापही ठोस अशी माहिती दिलेली नाही. तो पोलिसांनी उडवाउडवीची उत्तरे देत असल्याची माहिती आहे. या नार्को टेस्टमुळे अत्यंत हाय प्रोफाइल किंवा गुंतागुंतीच्या गुन्ह्याच्या तपासात मदत होते. श्रद्धा हत्याकांडातही दिल्ली पोलिसांना अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाल्यानंतर किंवा त्याच्या माध्यमातून तपासाला वेग येऊ शकतो.